मुंबई पोलीस कायमच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असतात. वेगवेगळे फोटो, व्हिडियो आणि पोस्ट शेअर करुन मुंबईकरांमध्ये वाहतुकीबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम ते करतात. ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी मुंबईकरांशी चांगला कनेक्ट ठेवल्यामुळे त्यांचे विशेष कौतुकही केले जाते. नुकताच असाच एक व्हिडियो पोलिसांनी आपल्या युजर्ससाठी पोस्ट केला असून त्याद्वारे जागृती करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. अभिनेता टॉम क्रूज याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ या सिनेमाचा एक व्हिडियो त्यांनी नुकताच शेअर केला आहे. गेल्याच शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील एक प्रसंग ट्विट करत त्यांनी रस्ते वाहतुकीबाबत संदेश दिला आहे.

या व्हिडियोमध्ये टॉम क्रूज आपल्या खास बाईकवर दिसत आहे. त्यामध्ये त्याने हेल्मेट घातलेले नाही. त्यानंतर त्याची बाईक एका कारला ठोकते आणि टॉम क्रूज रस्त्यावर पडतो. या व्हिडियोबरोबर पोलिसांनी नागरिकांना, अशाप्रकारचे स्टंट मुंबईच्या रस्त्यांवर करु नका असा संदेश दिला आहे. हा मिशन इम्पॉसिबल चित्रपटाचा व्हिडियो शेअर करत त्यावर लिहीले आहे, की तुम्ही जर मुंबईच्या रस्त्यांवर अशाप्रकारची अॅक्शन दाखवली तर तुम्हाला दंड ठोठावणे आमच्यासाठी इम्पॉसिबल मिशन नाहीये. ते आमचे काम आहे त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका.

मात्र मुंबई पोलिसांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यावर रिप्लाय दिले आहेत. त्यामध्ये मुंबईमधील खड्ड्यांविषयी लोकांनी सडकून टिका केली आहे. मुंबईतील खड्ड्यांमुळे टॉम क्रूजसारखी गाडी चालविणे शक्य नसल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. सरकारला लक्ष्य करत अनेकांनी उघडी असणारी गटारे आणि रस्त्यांची दुरावस्था याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे पोलिसांनी चांगल्या अर्थाने टाकलेला हा व्हिडियो मुंबईकरांपर्यंत चुकीच्या अर्थाने पोहोचला आहे.