करोनाचं संकट अद्यापही टळलं नसल्याने मुंबई पोलीस लोकांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचं तसंच सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याचं सतत आवाहन करत आहेत. पण हे आवाहन करताना मुंबई पोलिसांनी अत्यंत भन्नाट कल्पना वापरल्या आहेत. मुंबई पोलीस ट्विटरच्या माध्यमातून लोकांना सुरक्षेच्या नियमांबद्दल जागरुक करत आहेत. यासाठी अनेकदा ते प्रसिद्ध चित्रपट, डायलॉग, अभिनेते यांचा वापर करत आहेत. आणि यावेळी मुंबई पोलिसांच्या मदतीला धावला आहे तो म्हणजे ‘बबड्या’.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील बबड्या हे पात्र चांगलंच प्रसिद्द झालं आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा सोहम उर्फ ‘बबड्या’ची भूमिका साकारत आहे. बबड्याचं हे पात्र नकारात्मक दाखवण्यात आलं. यामुळे लोकांना त्याची चीड असून यावरुन अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. मुंबई पोलिसांनी मात्र बबड्याचा फोटो ट्विट करत तो एक जबाबदार नागरिक असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी बबड्याचा मास्क घातलेला फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, ‘कथानकात ‘ट्विस्ट’ आहे! बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे”. या ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना मास्क वापरत एक जबाबदार नागरिक होण्याचं आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट मात्र लोकांना फार आवडलं आहे.

बबड्याची भूमिका निभावणारा आशुतोष हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. ‘अभिनय क्षेत्रात काम करायचं पक्क झाल्यावर आशुतोषने ‘अनुपम खेर इन्स्टिटय़ूट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. पुढे कला क्षेत्राची ओळख व्हावी यासाठी निर्माते सुनील भोसले यांचा हात धरून त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात प्रवेश केला. ‘दुर्वा’सारखी मालिका, ‘वन्स मोअर’ चित्रपट आणि नुकताच येऊन गेलेला ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांनी त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं, परंतु मनासारखं यश प्राप्त झालं नाही, अशी खंतही तो व्यक्त करतो.