पावसाळ्यातील सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत निराळी  स्थिती निर्माण झाल्यामुळे गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात  केवळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. रविवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस मध्य रात्रीपर्यंत जोरदार बरसला. रात्री १२ नंतरही पावसाची रिपरिप सुरुच राहिली. या पावसामुळे रविवारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये ३३ जागरिकांचा बळी गेला. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं. विशेष म्हणजे या पावसाचा फटका केवळ मुंबईकरांना बसला असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राण्यांनाही बसलाय. याच मुसळधार पावसाचा प्राण्यांना बसलेल्या फटक्याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय.

मध्यरात्रीच्या सुमारास बोरिवलीमधील शांतीवन परिसरामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये एक हरीण वाहून आलं. छतापर्यंत बुडलेल्या गाड्या आणि त्या पाण्यामधून वाट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ शूट करणारे नागरिक खरोखर हे हरीण आहे का? असा प्रश्न सुरुवातीला विचारतात आणि नंतर हरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते हाका मारताना दिसत आहे. मात्र हे हरीण या लोकांजवळ येतं आणि पुन्हा पाठ फिरवून गाडीच्या मागे निघून जातं. हे हरीण इथे नक्की कुठून आणि कसं आलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे हरीण राष्ट्रीय उद्यानातून पाण्याच्या प्रवाहासोबत आलं असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पाणी ओसरल्यानंतर हे हरीण पुन्हा जंगलात गेलं असावं असं येथील पर्यावरण प्रेमींनी म्हटलं आहे. मात्र या हरणाबद्दलची सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.

राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती

रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती निर्माण झाली. उद्यानातील कार्यालये व कर्मचाऱ्यांची सेवा निवासस्थाने येथे पाणी शिरले. तसेच रस्ते, पूल यांनाही हानी पोहोचली; मात्र जीवितहानी झाली नाही. रविवारी सकाळपर्यंत बोरिवली भागात २०० मिमीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे  उद्यानाचा बराचसा भाग जलमय झाला होता. उद्यानाच्या कार्यालयांमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थानांमध्ये पाणी शिरले. ‘‘काही वर्षांपूर्वी उंच भागावर कार्यालये उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी देऊ के ला होता. तत्कालीन संचालकांनी हा निधी सरकारला परत के ला. याउलट जनतेच्या पैशांतून १ कोटी रुपये के वळ एका विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी खर्च के ले. सध्या या विश्रामगृहामध्ये दुरुस्तीचे मोठे काम निघाले आहे,’’ अशी माहिती कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅक्शन इंडियाचे कार्यकारी विश्वस्त देबी गोएंका यांनी दिली.  राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने उद्यानातील रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे.