मुंबईला मंगळवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आणि मुंबईकरांनी जवळपास २६ जुलैसारखीच परिस्थिती पुन्हा एकदा अनुभवली. अनेक जण सकाळी ९ वाजता ऑफिसला जायला निघाले आणि ते पावसामुळे सायंकाळपर्यंत ऑफिसला पोहोचू शकले नाहीत. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांची अवस्था बिकट झाली. या परिस्थितीतही अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. अनेकांनी यावर विनोद शेअर केले तर काहींनी रेल्वे यंत्रणा आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराविषयी रागही व्यक्त केला.

या पाण्यातून वाट काढत घर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईकरांचे खूपच हाल झाले. अनेकांनी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना ऑफीस किंवा घरातून बाहेर पडू नका असे आवाहन केले. आपण कोणत्या परिस्थितीत अडकलोय हे फोटो आणि पोस्टद्वारे सांगितले. हॅशटॅगचा वापर करत अनेकांनी या परिस्थितीवर चिडचिड न करता आपण आनंदी असल्याचेही कळवले. याबरोबरच फेसबुक तसेच इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साईटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत परिस्थितीची माहिती दिली.

जो मुलगा ठाणे, कल्याण आणि वाशीहून मुंबई सेंट्रल, दादर किंवा चर्चगेट आणि सीएसटीला पोहचू शकेल त्याच्याशी नक्की लग्न करा असा सल्लाही एकाने दिला आहे. याशिवाय विविध मेसेज आणि परदेशातील काही फोटोही ट्विपल्सनी ट्विट केले आहेत.