मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला वर्ग मोठा आहे. या गेम्सचे इतके व्यसन तरूणाईला लागले आहे की, या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. पण आता विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले हे कळलेच नाही. रशियामध्ये दहशत पसरवणाऱ्या ‘ब्ल्यू व्हेल’ या एका ऑनलाइन खेळाचा पहिला बळी भारतात गेला असल्याचे समजते. अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळेच त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

मनप्रीतने आपल्या राहत्या गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी व तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी मनप्रीतने एका मित्राला कळवले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळामुळे रशियामध्ये तब्बल १०० हून अधिक मुलांनी आत्महत्या केली होती. या खेळात प्लेअर्सला ५० वेगवेगळी आव्हानं दिली जातात. म्हणजे एखादा हॉरर मुव्ही बघणं किंवा स्वत:ला जखमी करून घेणं वगैरे आणि प्रत्येक आव्हान पूर्ण झालं की त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केलं नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात, असेही इंग्लंडमधल्या अनेक वेबसाईट्सने म्हटले आहे. दुर्दैव म्हणजे एकदा का हा खेळ डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही असंही एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले होते. यामुळे युजर्सची पर्सनला माहिती देखील हॅक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुलं १२ ते १६ वयोगटातली असल्याचे समजत आहे. रशियामध्ये या खेळामुळे अनेक लहान मुलांचे जीव गेले असले तरी भारतात या खेळामुळे एखाद्याने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना असेल.