मूल एकदा दत्तक म्हणून घेतले की त्या मुलाचे नाव, जात, धर्म हा दत्तक घेतलेल्या पालकांप्रमाणेच असतो. मूलाला आपले मानून वाढवणारे हे पालक त्याच्यावर आपल्या कौटुंबिक रितीरिवाजांनुसार संस्कार करतात. पण एका मुस्लिम कुटुंबाने अतिशय आदर्श उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवले आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. उत्तराखंडमधील एका दाम्पत्याने मूल दत्तक घेण्याचा विचार केला आणि अनाथाश्रमामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १२ वर्षांच्या एका हिंदू मुलाला दत्तक घेतले.

आता मुस्लिम कुटुंबात आल्याने त्यांच्या प्रथेप्रमाणे त्याचे पालनपोषण होईल असा आपला सहाजिकच समज होईल. पण दुसऱ्या धर्मात आला तरीही मुलाला दत्तक घेतलेल्या दाम्पत्याने त्याच्यावर कोणत्याच गोष्टी लादल्या नाहीत. सुरुवातीपासून या घरात मुलासाठी सर्व हिंदू सण साजरे होत होते, तेही अतिशय उत्साहात. त्यानंतर मुलगा वयात आल्यावर त्याच्या लग्नाचा विषय घरात सुरु झाला. त्यानंतर या दाम्पत्याने आपला मुलगा मूळ हिंदू असल्याने त्याचे लग्न हिंदू पद्धतीने करायचे ठरविले.

मुस्लिम धर्मातील कुटुंबियांनी आपल्या मुलासाठी अशाप्रकारचा निर्णय घेणे आणि त्याचे धार्मिक स्वातंत्र्य जपणे ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद गोष्ट आहे. या घरात आलेली नववधू म्हटली, मी घरात होळी, दिवाळी आणि इतर सगळे हिंदू सण साजरे करते. घरातून मला सगळ्या गोष्टीसाठी कायम पाठिंबा असतो असेही तिने सांगितले.