लहान मुलांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. कधी हे लहानगे पोळी लाटत असतात तर कधी आणखी काही. लहान मुलांची कोणतीही गोष्ट सगळ्यांनाच भावणारी असल्याने हे व्हिडिओ कमी काळात सगळ्यांच्याच काळजाचा ठाव घेतात आणि मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. सध्या असाच एक व्हिडिओ नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत असल्याचे दिसते. मुस्लिम असलेली एक लहान मुलगी या व्हिडिओमध्ये मराठीतून भाषण करताना दिसत आहे. ही मुलगी इतकी अस्खलित मराठी बोलते की ऐकणारे तिचे बोलणे ऐकतच राहतात. तिच्या बोलण्यातील गोडव्याने तिने लाखो मराठी लोकांची मने जिंकली नाहीत तरच नवल.

या चिमुकलीचे नाव आहे सायमा रियाज शेख. अल रिजवान ग्रुप ऑफ स्कूल्स या शाळेत ती स्टेजवर उभी राहून आपले भाषण अतिशय आत्मविश्वासाने देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. इतकेच नाही तर तिचे अमोघ वक्तृत्व, अलौकिक भाषाशैली, शब्दांचा अचूक उच्चार आणि बोलण्यातील चढउतार पाहून आपण खरेच थक्क होतो. मराठी दिनानिमित्त तिने केलेले हे भाषण सध्या जोरदार गाजत आहे. त्यामुळे तिचे तर कौतुक होतच आहे पण तिच्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचेही कौतुक होत आहे. मुस्लिम समाजातील अनेक व्यक्ती मराठी प्रांतात राहत असल्याने उत्तम मराठी बोलतात पण इतक्या कमी वयात दुसऱ्या एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत आवश्यक असते. सायमामध्ये हे सगळे गुण दिसून येतात.

आजची युवा पिढी आणि तंत्रज्ञान या विषयावर भाषण देताना सायमा करत असलेले हावभावही अतिशय नेमके आणि बोलके असल्याने तिचे भाषण भावणारे आहे. मोबाईलचे फायदे आणि तोटे ती अतिशय नेमकेपणाने समजावून सांगत आहे. आपल्या अमृतवाणीने या ही लहानगी महाराष्ट्राच्या कोटयवधी हिंदू आणि मुस्लिम बाधवांची मने जिंकली आहेत. या मुलीने घातलेला ड्रेसही तिच्या धर्माचे प्रतिक असल्याचे आपल्याला दिसते.