धर्माच्या भिंती ओलांडून एका मुस्लिम व्यक्तीने गर्भवती महिलेला रक्तदान करण्यासाठी रोजा तोडल्याची एक घटना समोर आली आहे. रुपेश कुमार यांची पत्नी डॉली यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिझर करावं लागणार असल्याने डॉली यांना B+ रक्ताची गरज लागणार होती. लॉकडाउन असल्याने अशावेळी रक्त कसं मिळणार याची चिंता रुपेश कुमार यांना सतावत होती. सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या आबिद सैफी यांनी रक्तदानासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून याबाबत माहिती मिळाली.

यानंतर आबिद यांनी एका क्षणाचाही विचार न करता रक्तदान करण्यासाठी तयारी दर्शवली. रक्तदान करण्यासाठी त्यांनी आपला रोजा तोडला आणि रुग्णालयात पोहोचले. डॉली यांना वेळीच रक्त मिळाल्याने प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. आबिद यांनी केलेल्या मदतीमुळे रुपेश कुमार भारावून गेले आणि त्यांनी आभार मानण्यासाठी फोनदेखील केला. आपल्या पत्नी आणि बाळाचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी आबिद यांचे आभार मानले. तसंच आपल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठी मदत करा अशी विनंतीही केली.

अबिद यांनी रमजानच्या महिन्यात एखाद्याला मदत करण्याची संधी आपल्या देवाने दिली असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मुस्लिम व्यक्ती कधीही माणसांमध्ये भेदभाव करत नाही. मला मदत करायला मिळाली यापेक्षा मोठा आनंद नाही,” असंही आबिद यांनी सांगतिलं आहे.

“रमजानमध्ये देवाला संतुष्ट करण्यासाठीच रोजा ठेवला जातो. मी दोन लोकांचं आयुष्य वाचवलं आहे पाहून देव जास्त संतुष्ट होईल. माणुसकी नेहमीच धर्मापेक्षा मोठी असते. अनेकजण धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत. पण भेदभाव करणं किती चुकीचं आहे याची आम्हाला जाणीव आहे,” असं आबिद यांनी सांगितलं आहे.