अनेक गौरवर्णीय मॉडेल्स आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या जाहिराती करतात. यात सौंदर्यप्रसाधनांपासून ते कपडे, अँक्सेसरीजपासून ते चपलांपर्यंत सगळंच आलं. आता अमुक एका उत्पादानाची जाहिरात गौरवर्णीय मॉडेलनं केली म्हणून बाकीचे लोक त्या उत्पादनाची खरेदी करतच नाही असं होतं का? आता इथे हे ‘लॉजिक’ जर लावलं जातं तर मग माझ्यासाठी वेगळं ‘लॉजिक’ का?हिजाब परिधान करणाऱ्या मरिहा इद्रिसीनं हा सवला केला आहे.

एका ब्युटी कॅम्पेनमधून  जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप तिनं केला आहे. मी हिजाब घालते म्हणून माझी गच्छंती करण्यात आल्याचा धक्कादाक आरोप तिनं केला आहे. तिला जर कॅम्पेनमध्ये घेतलं तर ते ठराविक वर्ग आणि धर्मातील महिलांपूरताच मर्यादित राहिल असं कारण सांगून तिला ऐनवेळी हटवण्यात आलं आहे. २०१५ मध्ये ‘एच अँड एम’ या ब्रँडच्या जाहिरातीतून ती पहिल्यांदाच झळकली होती. त्यामुळे मॉडेलिंगच्या विश्वातले अनेक पूर्वग्रह तिनं तोडले होते.

‘तुझ्यामुळे अनेक मुस्लिम महिलांना नोकरी मिळाली’ असं काही मुस्लिम महिलांनी तिला सांगितलं होतं. मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्त्व करणारी स्त्री म्हणून ती ओळखली जायची. पण आता ब्युटी कॅम्पेनमध्ये तुला समाविष्ट करून घेतलं तर उत्पादन फक्त ठराविक वर्गापूरता मर्यादीत राहिल आणि इतर लोक ते खरेदी करणार नाही असं कारण सांगत तिला यातून वगळण्यात आलं आहे.