पुरूषांचे फूटबॉलचे सामने मुस्लीम महिलांनी बघू नयेत असा फतवा लखनौ येथील दारूल उलूमच्या एका ज्येष्ठ मुफ्तींनी काढला आहे. अर्ध्या पँटमध्ये पुरूष फूटबॉल खेळतात, त्याखाली त्यांचे शरीर उघडे असते, अशा पुरूषांना बघणे इस्लामच्या शिकवणुकीविरोधात असल्याचे मुफ्ती अथार कासमी यांनी म्हटले आहे. मुस्लीम महिलांनी त्यामुले पुरूषांचे फूटबॉल सामने बघू नयेत असा फतवा त्यांनी काढला आहे. दारूल उलूम ही उत्तर प्रदेशातील देवबंद शहरातली सुन्नी मुस्लीमांची आशियातली सगळ्यात मोठी धार्मिक संस्था असून कासमी हे तिथं मुफ्ती असल्यामुळेच त्यांच्या या अशा विचित्र फतव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

जे नवरे आपल्या बायकांना टिव्हीवर फूटबॉलचे सामने बघू देतात, त्यांच्यावर देखील कासमी यांनी टीका केली आहे. तुम्हाला काही लाज वाटते की नाही? तुम्ही देवाला घाबरता की नाही? असा सवाल विचारत बायकांना असं काही बघूच कसं देता असा जाबच त्यांनी समस्त मुस्लीम नवरे मंडळींना विचारला आहे. सुन्नी मुस्लीमांचं राज्य असलेल्या सौदी अरेबियामध्ये फुटबॉलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघण्यास बंदी होती, परंतु ती बंदीदेखील त्या कर्मठ देशात उठवण्यात आली आहे आणि भारतासारख्या उदारमतवादी व सेक्युलर देशामध्ये असा फतवा काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

महिलांना फूटबॉलचे सामने बघण्याची गरजच काय असा प्रश्नही कासमींनी विचारला आहे तसेच पुरूषांच्या मांड्या बघून त्यांना कशाचा लाभ होणार आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला. महिलांचं लक्ष फक्त मांड्यांकडे राहील आणि त्यांना सामन्याचा स्कोअरदेखील सांगता येणार नाही असंही कासमी म्हणाले आहेत.

सुन्नी पंथाशी संबंधित हनाफी ही परंपरा 150 वर्षे जुनी असलेल्या दारूल उलूममध्ये शिकवली जाते. इस्लामचा संकुचित अर्थ लावण्याची या संस्थेची परंपरा असून अफगाणिस्तानातील तालिबानसारख्या कट्टर धार्मिक संघटनांना वैचारिक आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. अशा दारूल उलूमच्या या फतव्याचा लखनौ शहरातील मुस्लीम महिलांच्या संघटनांनी निषेध केला आहे.

या फतव्याचा अर्थ मुस्लीम महिलांनी कुठलाच अथलेटिक क्रीडा प्रकार बघू नये असा आहे. पुरूषांना खेळताना बघणं अनैतिक कसं काय असू शकतं असा सवाल एक महिला साहिरा नसीह यांनी विचारला आहे. याआधीही मुस्लीम महिलांनी ब्युटी पार्लरमध्ये जाऊ नये, घट्ट कपडे घालू नयेत असे चमत्कारिक फतवे काढण्यात आले होते.