आकांक्षा पुढती आभाळ ठेंगणे…. ही ओळ ऐकल्यावरच एक प्रकारची प्रेरणा मिळते किंवा मग उगाचच आभाळाला गवसणी घालण्याची इच्छा मनोमन येते. मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या दिव्याच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. आज ती एक यशस्वी वैज्ञानिक असून, तिच्या नावापुढे डॉक्टर ही मानद पदवीही लागली आहे. आपल्या आईमुळेच आज हे सर्व शक्य झालं असल्याचं ती न विसरता सांगत आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या पेजच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिव्याची यशोगाथा सर्वांच्याच भेटीला आहे. खुद्द दिव्यानेच ती मोठ्या आत्मियतेने सर्वांसमोर मांडली आहे.

चाळ संस्कृतीला अगदी जवळून पाहिलेल्या किंबहुना त्यात आपल्या आयुष्यातील बराच काळ व्यतीत करणाऱ्या दिव्याची ही कथा ऐकून अडचणींवर मात करत ध्येयप्राप्ती करणं नेमकं काय असतं याची जाणिव होत आहे. आपल्या आईने अगदी सुरुवातीपासून दोन गोष्टी आवर्जून मनावर बिंबवल्या. पहिली म्हणजे कुटुंबाला नेहमी प्राधान्य द्या आणि दुसरी म्हणजे नेहमी सत्कर्म करा ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे परत येणारच, असं म्हणत आईने दिलेल्या या कानमंत्राचा आपल्याला पुढे वाटचाल करण्यासाठी नेमका कसा फायदा झालं, याविषयी तिने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधत आपल्या आईच्या काही आठवणी शेअर केल्या.

मुंबई… स्वप्ननगरीमध्ये कोणाचीही ओळख आणि आधार नसताना तिचं कुटुंब आलं. रेल्वे कॉलनी, म्हणजेच चाळवजा वस्तीत हे कुटुंब राहू लागलं. आपली आई फार शिकली नाही, पण, तरीही तिने कुटुंबासाठी मात्र सर्वस्व पणाला लावलं. घरात असणाऱ्या पलंगाखाली अभ्यास करण्यापासून ते रस्त्यांवरील दिव्यांच्या उजेडात अभ्यास करत दिव्याने आपली शिक्षणाची जिद्द पूर्ण केली. दहावी इयत्तेत असतेवेळी तिला ६३ टक्के मार्क मिळवले. अर्थात त्या काळात ते खूप जास्त होते. त्यानंतर ज्यावेळी कॉलेजमध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा आई- बाबांनी तिला या नव्या आयुष्याच्या पायरीवर सोडलं होतं. प्रतिकूल परिस्थितीर मात करत दिव्या पुढे जात राहिली. या साऱ्यामध्ये तिला आईची साथ मिळाली. आई म्हणजे माध्यासाठी आधरस्तंभ… असं म्हणत आजच्या घडीला वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आईची जबाबदारी घेतली आणि तिला काही बाबतीत या जगात भरभरुन जगायला शिकवलं.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

आज दिव्या कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तिचा मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी तिच्या आईचीही उपस्थिती होती. सहसा कोणत्याही कार्यक्रमाला जाणं टाळणाऱ्या आईविषयी सांगताना दिव्या म्हणाली, ‘आपल्या मुलीच्या आयुष्यातील या खास दिवसाला हजेरी लावण्यासाठी चक्क केसात फुलं माळली होती, ती सुरेखपणे तयार झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी पुरस्कार स्वीकारतेवेळी ती भावूक झाली होती. ते स्वप्न जणू आम्ही दोघी जगत होतो….’