जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांचं आडनाव मलिक नसेल असं भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने स्पष्ट केलं आहे. सानियाने 2010 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केलं आहे. सानिया आणि शोएबला जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांचं आडनाव काय असेल असा प्रश्न त्यांच्या लग्नापासूनच चाहत्यांकडून विचारला जात होता, अखेर सानियाने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

‘गोवा फेस्ट 2018’ मध्ये एका चर्चासत्रात बोलताना सानियाने याबाबत सांगितलं. मी आणि माझ्या पतीने याबाबत चर्चा केली आहे. भविष्यात मुलगी व्हावी अशी शोएब आणि माझी इच्छा आहे. तसंच कुटुंब वाढवण्याचा निर्णय जेव्हा घेऊ तेव्हा मुलांचं आडनाव मिर्झा-मलिक असेल असंही सानियाने स्पष्ट केलं आहे.

लैंगिक भेदभावाचा अनुभव सांगताना सानिया म्हणाली, काही नातेवाईक माझ्या वडिलांना तुम्हाला मुलगा व्हायला हवा असं सांगायचे, जेणेकरून तो खानदानाचं नाव पुढे नेऊ शकतो असं म्हणायचे. तुम्हाला एक मुलगा हवा असं जेव्हा कोणी माझ्या वडिलांना म्हणायचं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत भांडायचो असं सानिया म्हणाली. आम्ही दोघी बहिणी आहोत पण आम्हाला एखादा भाऊ पाहिजे होता असं आम्हाला कधीच नाही वाटलं असंही ती पुढे म्हणाली.