सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना समाजकार्यात प्रचंड सक्रिय असतो. अमेरिकेत असतानाही त्यांनी लॉकडाउनच्या काळात भारतातील गरीबांना मदत केली. ‘फीड इंडिया’ अंतर्गत त्याने आजवर हजारो गरीबांना अन्नदान केलं आहे. ही भूकेबद्दलची जाणीव भारतातील भूक पाहून त्यांच्यात निर्माण झाली का? असा प्रश्न बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याला विचारला गेला. या प्रश्नावर विकास खन्नाने दिलेलं उत्तर ऐकून अँकरची बोलतीच बंद झाली.

“आता तू प्रसिद्ध शेफ म्हणून ओळखला जातोस. तू बराक ओबामांसाठी जेवण केलं आहेस. जगप्रसिद्ध शेफ गॉर्डन रामसे यांच्या शोमध्ये झळकला आहेस. तुझा प्रवास एका गरीब कुटुंबातून सुरु झाला तरीही तू इतकं यश मिळवलंस. तुझ्यातील ही भूकेबद्दलची जाणीव भारतातील भूक पाहून निर्माण झाली का?” अशा आशयाचा प्रश्न मुलाखत घेणाऱ्या अँकरने विकास खन्नाला विचारला होता. या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून तुम्ही देखील चकित व्हाल.

“भूकेबद्दलची ही जाणीव भारतातून आलेली नाही. कारण माझं बालपण अमृतसरमध्ये गेलं आहे. तिथे एकत्र जेवणाची पद्धत आहे. त्याला आम्ही लंगर म्हणतो. या लंगरमध्ये एका वेळेस संपूर्ण शहर जेऊ शकतं. भूकेबद्दलची ही जाणीव माझ्यात न्यूयॉर्कमुळे आली. एका ब्राऊन रंगाच्या मुलाला अमेरिकेत नोकरी मिळवणं सोपं नव्हतं. न्यूयॉर्कमध्ये आल्यावर सुरुवातीच्या काळात जो संघर्ष मी केला त्याने मला भूकेचा खरा अर्थ शिकवला.” अशा आशयाचं उत्तर विकास खन्ना याने दिलं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विकास खन्ना एक सेलिब्रिटी शेफ आहे. जगातील नामांकित शेफपैकी एक म्हणून तो ओळखला जातो. त्याला फूड इंडस्ट्रीमधील नामांकित ‘मिशेलिन स्टार’ पुरस्कारानेही सन्मानित केलं गेलं आहे.