भारतातीलच नाही तर जगातील स्वच्छ शहराचा मान म्हैसूर शहराला मिळाला आहे. पण म्हैसूर शहराला मिळालेला मान हा खरच योग्य आहे का अशी शंका उपस्थित होण्याची वेळ आता आली आहे. म्हैसूरच्या राजघराण्याचे वंशज राजे यदुवीर वाडियार यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि खरच म्हैसूर जगातील स्वच्छ शहर म्हणून मिरवण्याच्या योग्यतेचा आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.
म्हैसूरमधली दस-याचा उत्सव हा जगप्रसिद्ध आहे. अगदी शाही थाटामाटात दसरा येथे साजरा केला जातो. म्हैसूरच्या दसरा उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आठवडाभर चालणारा हा शाही सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक आणि पर्यटक म्हैसूरमध्ये येता. दस-यानंतरच राजे यदुवीर यांनी म्हैसूर पॅलेसमधील दिवाणखान्याची दुर्दशा झालेला एका फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. दस-याचा सण संपल्यानंतर या महालातील दिवाणखान्यात लोकांनी कचरा केला. दस-यानिमित्त वाटण्यात आलेले अन्न हे महालाच्या जमीनीवर पडले होते. संपूर्ण दिवाणखान्यात उष्ट विखुरले होते. त्यामुळे लोकांच्या बेशिस्त वागण्याने संतप्त झालेल्या यदुवीर राजांनी हा फोटो सोशल मिडियावर टाकला आहे. भारतातील स्वच्छ शहराचे बिरूद मिरवण्याच्या आपल्याला खरोखरच हक्क आहे का असा सवाल त्यांनी केला आहे. जगातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक असलेल्या या महालाची अशा प्रकारे विटंबना केल्यानंतर हे बिरुद मिरवणे योग्य आहे असा प्रश्न त्यांनी जनतेला केला आहे. ‘एखाद्या सिनेमागृहात लोक कचरा करतात तसा कचरा लोकांनी या महालात करून ठेवला आहे. ही ऐतिहासिक वास्तू असून लोकांनी तिचे महत्त्व लक्षात घ्यावे’ असे आवाहनही त्यांनी एका पोस्ट मार्फत केले आहे.