जपानच्या आकाशात बुधवारी(दि.१७) एक पांढऱ्या रंगाच्या फुग्याच्या आकाराची रहस्यमयी वस्तू दिसली. आकाशात ही रहस्यमयी वस्तू दिसल्यानंतर सोशल मीडियामध्ये विविध चर्चा रंगल्या. या रहस्यमयी वस्तूला लोकांनी युएफओपासून, करोना व्हायरस आणि उत्तर कोरिया व एलियन्स यांच्याशी जोडत आपआपले तर्क मांडले.

वृत्तसंस्था reuters ने दिलेल्या वृत्तानुसार, जपानच्या सेंदई शहरातून घेतलेल्या टेलिव्हिजन फुटेजमध्ये एका क्रॉसच्या वरती फुग्याच्या आकाराची वस्तू दिसली. ‘ती रहस्यमयी वस्तू पहाटेच्या वेळेस दिसली. त्यानंतर बरेच तास ही वस्तू एकाच ठिकाणी होती. नंतर ढगांमुळे ती वस्तू दिसेनाशी झाली’, असे सेंदईच्या हवामान विभागाने सांगितले.


बुधवारी दुपारपर्यंत जपानच्या ट्विटरवर ही वस्तू ट्रेंडिंगमध्ये आली. अनेकांनी या वस्तूला युएफओ आणि उत्तर कोरियाने पाठवलेले फुगे म्हटलं. तर काही युजर्सनी ही वस्तू करोना व्हायरस पसरवत असावी असंही म्हटलं. दरम्यान, “दोन्ही वस्तूचा आकार आणि त्या कुठून आल्या याबाबत तपास सुरू आहे. पण, ती वस्तू नेमकी काय आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. हे एक प्रकारचं हवामान निरीक्षण उपकरण असू शकतं. पण ते आमचं नाहीये हे नक्की” असं हवमान विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.