News Flash

भारताच्या करोनामुक्तीचा प्लॅन आहे तयार: ३६ लाख कोटींच्या गुंतवणुकीला परवानगी द्या; मोदींच्या नावाने जाहिरात

जाहिरातीनंतर या अमेरिकन कंपनीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातायत

अमेरिकेमधील एका कंपनीने भारतामध्ये ३६ लाख कोटी रुपये म्हणजेच ५०० बिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भात सुरु केलेल्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन म्हणजेच एनआयपीअंतर्गत ही गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे. मात्र या कंपनीसंदर्भात फारशी माहिती उपलब्ध नसली तरी कंपनीने आपला प्रस्ताव थेट एका जाहिरातीच्या माध्यमातून मांडल्याने सोशल नेटवर्किंगवर चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीमध्ये कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गुंतवणुकीसाठी परवानगी द्यावी अशी मागणीही केलीय.

सोशल नेटवर्किंगवर या कंपनीने वृत्तपत्रामध्ये दिलेली जाहिरात व्हायरल झाली आहे. अनेकांनी या कंपनीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या कंपनीला भारतामध्ये गुंतवणूक करायची असल्यास ते थेट पंतप्रधान मोदींना भेटून किंवा अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क का करत नाहीत. गुंतवणुकीसंदर्भात वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्याची काय गरज होती? या कंपनीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. लॅण्डोमस रिअ‍ॅलिटी आयएनसी नावाच्या या कंपनीचे भारतीय बाजारपेठेमधील मुल्य केवळ एक लाख रुपये इतके आहे. या समुहाचे अध्यक्ष प्रदीप कुमार सत्यप्रकाश यांच्या नावाने जाहिरात छापण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या संकल्पनेनुसार नवीन इंडियाच्या उभारणीमध्ये कंपनीला हातभार लावायचा असून त्यासाठी मोदींनी परवानगी द्यावी अशी मागणी जाहिरातीमधून करण्यात आलीय.

“आम्हाला गुंतवणुकीची एक संधी द्यावी”

“लॅण्डोमस रिअ‍ॅलिटी व्हेचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अमेरिका पहिल्या टप्प्यामध्ये गुंतवणुकीचा भाग म्हणून राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन आणि या प्रकल्पांव्यक्तिरीक्तही ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करु इच्छित आहे,” असं जाहिरातीत म्हटलं आहे. जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदींनी आवाहन करण्यात आलं आहे की, “न्यू इंडियाच्या तुमच्या व्हिजनमध्ये आम्हाला योगदान देण्याची संधी द्यावी,” अशी मागणी कंपनीने केलीय. भारताच्या नवनिर्माणासाठी आणि पाच ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीचं उद्देश साद्य करण्यासाठी आम्हाला सरकारची मदत करायची असल्याचाही उल्लेख जाहिरातीमध्ये आहेत. “भारताला या साथीपासून मुक्त करण्यासंदर्भातील एक ठोस योजना आमच्याकडे आहे. आम्हाला गुंतवणुकीची एक संधी द्यावी,” असं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीबद्दलची माहिती 

या कंपनीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. साध्या गुगल सर्चवर या कंपनीबद्दलच्या माहितीनुसार कंपनीची नोंदणी न्यू जर्सीमधील आहे. कंपनीच्या वेबसाईटवर याशिवाय इतर कोणतीही माहिती नाहीय. भारतामध्ये या समुहाने स्थापन केलेल्या लॅण्डोमस रिअ‍ॅलिटी व्हेचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा कारभार १७ जुलै २०१५ पासून सुरु असल्याचे दिसून येत आहे. या कंपनीची नोंदणी बेंगळुरुमध्ये करण्यात आली आहे.

सोशल नेटवर्किंगवर चर्चा आणि ट्रोलिंग

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतामध्ये ३६ लाख कोटींच्या गुंतवणुकीची परवानगी मागणाऱ्या या कंपनीचे शेअर कॅपिटल १० लाख रुपये तर पेडअप कॅपिटल केवळ एक लाख इतकं आहे. सोशल नेटवर्किंगवर या जाहिरातीनंतर कंपनीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजीव कुमार यांनी, “एवढ्या मोठ्या गुंतवणुकीसाठी पंतप्रधानांशी संपर्क करण्याचा हा मार्ग आहे का? कोण आहे हे लोक? त्यांना मोदींची भेट घेणं एवढं कठीण झालं आहे का?” असा प्रश्न विचारलाय.

तर अन्य एकाने एवढा विश्वास या लोकांना येतो कुठून आसा प्रश्न विचारलाय.


कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार सत्यप्रकाश आणि निर्देशक ममता एचएन, गुणाश्री प्रदीप कुमार, सत्यप्रकाश प्रदीप कुमार आणि रक्षित गंगाधर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 1:50 pm

Web Title: mystery us firm offers to invest 500 bn usd to make india covid free seeks pm modi appointment scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 VIDEO:…जेव्हा रोहित पवार कोविड सेंटरमध्ये सैराटमधल्या ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकतात
2 बेरोजगारीमुळे ‘ती’ माझी होऊ शकली नाही; प्रियकराने दिला मुख्यमंत्र्यांना शाप
3 Work From Home मुळे ट्विटरच्या ऑफिसला टाळं; दिल्ली पोलिसांची निराशा
Just Now!
X