आपल्या आजूबाजूला अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात, आपल्याला त्या पटतही नाही. काही जण फक्त या गोष्टींवर चर्चा करतात. प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली की काढता पाय घेतात. पण फार कमी लोक आहेत की जे ही परिस्थिती बदलतात. नागालँडमधला २८ वर्षीय मारू हे पोलिस कॉन्स्टेबल या लोकांमधला एक. नागालँडमधल्या फुत्सेरो गावात काही दिवसांपासून कचरा नेणा-या गाड्या बंद पडल्या होत्या. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा कच-याचा ढीग जमा झाला होता. कच-यांची दुर्गंधी गावभर पसरली होती. पण यावर कोणीच काही करत नव्हते. कच-याच्या गाड्या बंद झाल्याने ही समस्या काही सुटणारी नव्हती. येणारे जाणारे परिस्थीतीच्या आणि सरकारच्या नावाने खडे फोडत होते, पण दुस-यांना दोष देत बसण्यापेक्षा मारूने हातात झाडू घेतली आणि स्वत:च्या मारूती गाडीचे कचरा वाहून नेणा-या गाडीत रुपांतर केले.

वाचा : ७० वर्षांचा सहवास आणि निरोपही साथ साथ

मारू स्वत: कचरा गोळा करतात आणि आपल्या गाडीत भरून या कच-याची विल्हेवाट लावतात. दिवसातून किमान चार ते पाच वेळा त्यांच्या फे-या होतात. पूर्वी कच-याचा एवढा ढीग साचला होता की तो गोळा करण्यासाठी दिवसातून किमान वीस फे-या तरी होत असतं. पण या कामासाठी त्यांना आर्थिक साहाय्य मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. गाडीसाठी लागणारे पेट्रोल ते स्वत:च्या पैशातून भरतात असेही त्यांनी हिंदुस्थान टाइम्सला सांगितले. मारूचे काम दखल घेण्यासारखेच आहे. नागालँडमधल्या एका छोट्या गावात राहून मारू खूप चांगले काम करत आहे यासाठी आपल्याला बक्षीस मिळावे अशी त्यांची मुळीच अपेक्षा नाही पण इतरांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा एवढीच त्यांची इच्छा आहे.