सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमियर लीगचीच (आयपीएल) चर्चा आहे. करोनामुळे देशभरातील खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. त्यामुळेच आता आयपीएलच्या माध्यमातून क्रिडा चाहत्यांना अनेक महिन्यानंतर क्रिकेटचा आनंद घेता येत आहे. सोशल मीडियावरही आयपीएलची चांगलीच चर्चा रंगल्याचे चित्र पाहायला मिळते. अगदी कोणत्या संघाला समर्थन करणारा इथपासून ते स्कोअरकार्ड, पॉइण्ट टेबल्स आणि मिम्स असा सर्वसमावेश चर्चेचा विषय सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेकदा सामन्यांमधील एकादा फोटो किंवा क्षण हा मिम्सचा विषय ठरतो. असंच काहीसं झालं आहे वरुण चक्रवर्तीसोबत. वरुणच्या गोलंदाजीवर षटकार लगावण्यात आल्यानंतर त्याने दिलेली रिअॅक्शन कॅमेरामनने अचूक टीपली आणि हा फोटो व्हायरल झाला. विशेष म्हणजे अनेक मिम्सच्या पेजेवर वापरण्यात आलेला हा फोटो नागपूर पोलिसांनाही ट्विट केला आहे.

शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगला. दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. याच सामन्यामध्ये १२ वे षटक वरुणने टाकले. या षटकामध्ये फलंदाजाने वरुणला षटकार लगावल्यानंतर त्याने दिलेली रिअॅक्शन अगदीच मजेशीर होती. या फोटोची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली. नागपूर पोलिसांनाही हा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. या फोटोच्या मदतीने नागपूर पोलिसांनी एक महत्वाचा मेसेजही दिला आहे.

वरुणचा व्हायरल झालेला फोटो शेअर करत नागपूर पोलिसांनी, “जेव्हा तुम्ही स्वत:चा ओटीपी एखाद्या फसवणूक करणाऱ्या खोट्या बँक अधिकाऱ्याला देता,” अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.

“तुम्हाला कोणीही फोन केला आणि तुमची खासगी माहिती मागितली तरी त्यांना तुमचा ओटीपी आणि सीव्हीव्ही क्रमांक देऊ नका,” असंही पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी अगदी कल्पकपणे या फोटोचा वापर केला आहे.