करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. या काळात लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमद्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मात्र यानंतर केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी काही भागांमध्ये इतर दुकानं सुरु करण्यासाठी सशर्थ परवानगी दिली आहे. या काळात देशभरातील पोलीस यंत्रणेवर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी आहे.

सोशल मीडियावरील मिमचा वापर करुन महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा, करोनाविषयी जनजागृती करत आहेत. नागपूर पोलिसांनी जनतेला लॉकडाउन काळात अत्यावश्यक गोष्टी आणण्यासाठी बाहेर पडताना, मास्कचा वापर करणं महत्वाचं आहे हे सांगण्यासाठी चित्रपटाच्या मिमचा वापर केला आहे. कुछ कुछ होता है चित्रपटातील शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यावर चित्रीत झालेल्या प्रसंगाचं मिम शेअर करत नागपूर पोलिसांनी जनजागृती केली आहे.

नेटकऱ्यांनीही नागपूर पोलिसांच्या या प्रयत्नाला चांगलीच दाद दिली आहे. महाराष्ट्रात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. आजही अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणा सांगत असलेल्या नियमांचं पालन करणं हे नागरिकांसाठी गरजेचं बनलं आहे.