अनेकदा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या खाण्यापिण्यावर किती खर्च होतो, हे आपण पाहत नाही. तसं जरी असलं तरी तो खर्च मर्यादित असतो. जर एका दिवसाच्या नाश्त्यावर तुमचा किती खर्च होत असेल, असा प्रश्न जर विचारला तर नक्कीच त्याचं उत्तर पन्नास, शंभर किंवा जास्तीत जास्त पाचशे रूपये असं असेल. असाच एक अनोखा किस्सा घडला तो म्हणजे नागपुर विद्यापीठात. नागपूर यूनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ स्टडीजच्या (बीओएस) तीन सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीत आलेलं चहा नाश्त्याचं बिल पाहून सर्वांचेच डोळे पांढरे झाले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बीओएसचे केवळ तीन सदस्य सहभागी झाले होते. या दोन दिवसीय बैठकीत त्यांनी तब्बल 99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागवल्याचा उल्लेख बिलामध्ये करण्यात आला आहे.

नागपूर विद्यापीठात झालेल्या तीन सदस्यांच्या या बैठकीत 99 कप चहा आणि 25 कप कॉफीचे तब्बल दीड लाखांचे बिल आल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, हे बिल जेव्हा विद्यापीठाचे कुलगुरू एस.पी.काणे याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. तसेच त्यांनी या बिलाला मंजुरी देण्यासही नकार दिला. या प्रकरणाचा आर्थिक विभागाने तपास करण्यास सुरूवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, हे बिल जेव्हा अकाऊंट विभागाच्या राज हिवासे यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तसेच त्यांनी याबाबत कुलगुरूंकडे तक्रार केल्याचेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आम्ही या बिलाला मंजुरी देण्यास नकार दिला आणि संबंधित विभागाकडे ते बिल पुन्हा पाठवून दिले. तसेच केवळ चहा आणि कॉफीचे बिल इतके कसे आले याबाबत संबंधित विभागाला स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आले आहे. जर हे बिल योग्य असेल तर सिद्ध करावे, असेही सांगण्यात आल्याचे हिवासे यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र आणि अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांच्या चहानाश्त्याची व्यवस्था विद्यापीठाकडूनच करण्यात आल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.