सध्या जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला असून अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहे. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सींगचे नियम पाळणे यासारख्या गोष्टींची काळजी घेत खबरदारी बाळगण्यात येत आहे. करोना संसर्गाच्या भीतीमुळेच हस्तांदोलन टाळण्याचा सल्लाही दिला जात आहे. विशेष म्हणजे हॅण्ड शेक करुन एकमेकांचे स्वागत करण्याऐवजी आता भारतीय पद्धतीने म्हणजेच नमस्कार करत एकमेकांचे स्वागत केलं जात आहे. असेच दृष्य नुकतेच दिसून आले ते फ्रान्समध्ये.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांचे स्वागत करताना हॅण्ड शेक करण्याऐवजी नमस्ते करत स्वागत केलं. बुघवारी मर्केल या सध्या फ्रान्समध्ये आहेत. दक्षिण फ्रान्समध्ये फोर्ट डी ब्रेगाकानॉन येथे असणाऱ्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानला भेट दिली. त्यावेळी मर्केल यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभ्या अशणाऱ्या मॅक्रॉन यांनी मर्केल गाडीमधून उतरताच दोन्ही हात जोडून नमस्ते म्हणत त्यांचे स्वागत केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर थेट इतर व्यक्तींना स्पर्श करणे टाळावे असं आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. याच गोष्टीचे भान ठेवत मॅक्रॉन यांनी हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्तेचा पर्याय निवडला. मर्केल यांनाही मॅक्रॉन यांनी केलेले स्वागत नमस्ते म्हणून हात जोडतच स्वीकारले.  मॅक्रॉन यांनीच ट्विटवरुन हा १२ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आता हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे चित्र दिसत आहे. ऑल इंडिया रेडिओच्या ट्विटवर हॅण्डलवरुनही तो शेअर करण्यात आला आहे. नमस्ते जागतिक स्तरावर पोहचलं आहे असं हा व्हिडिओ शेअर करताना ऑल इंडिया रेडिओने म्हटलं आहे.

इतरही अनेक युझर्सने हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला आहे.

१)

२)

३)

मात्र अशाप्रकारे नमस्ते करुन एकमेकांचे स्वागत करणारे मर्केल आणि मॅक्रॉन हे काही पहिले जागतिक नेते नाहीत. यापूर्वी मार्च महिन्यामध्येच ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता त्यावेळीही असाच एक व्हिडिओ समोर आला होता. ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य असणाऱ्या प्रिन्स चार्ल्स यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये लोकांशी हस्तांदोलन करण्याऐवजी चक्क भारतीय पद्धतीच्या नमस्तेचा अवलंब केल्याचे या व्हिडिओत पहायला मिळालं होतं.