पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याच्या व्यासपीठीवरील भावनिक भाषणाची चर्चा रंगल्यानंतर आता गोव्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पंतप्रधानांनी गोव्यातील विकास प्रकल्पाना भेट दिल्यानंतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली होती. या कार्यक्रमामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर , सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते. विकास प्रकल्पाची पाहणी झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर आणि मोदी यांच्या भेटीचा क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २४ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी मोदींना पाणी देताना दिसत आहेत. मोदी पाणी पित असताना पासरेकर मोदींसमोर हात जोडून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मोदी आणि पारसेकर यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटीझन्सकडून प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. एका नेटीझन्सने पारसेकरांचे पंतप्रधानांसमोर पुढे मागे करणे समजू शकते. पण मोदी निवडून दिलेल्या प्रतिनिधी समोर असे कसे वागू शकतात असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर एका नेटीझन्सने पारसेकरांच्या या कृतीबद्दल खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून पारसेकर आपला आत्मसन्मान जागृत ठेवण्यास विसरल्याचे त्याने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये केलेल्या भावनिक भाषणाची जोरदार चर्चा रंगली होती. गोव्याच्या व्यासपीठावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. २ जी घोटाळा, कोळसा घोटाळा हे विषय करणाऱ्या लोकांना ४००० रुपयांसाठी रांगेत उभे केल्याचे सांगत मोदींनी काळ्या पैशासंदर्भातील निर्णय हा गोरगरिबांच्या हिताचा असल्याचे सांगितले होते. तसेच ७० वर्षांचा रोग १७ महिन्यांमध्ये बरा करायचा आहे. लोकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना आहे. पण देशवासियांनी फक्त ५० दिवस त्रास सहन करावा. असे आवाहनही यावेळी मोदींनी केले होते.