गेल्याच आठवड्यात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक करत ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यात . त्यानंतर सामान्य माणूस असो की भ्रष्टाचारी सगळ्यांची मोठी पंचाईत झाली. आता एक आठवडा झाला तरी या निर्णयामुळे झालेला गोंधळ काही शमला नाही. गेल्या आठवड्यापासून जगभरात फक्त दोन गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणत झाली एक तर अमेरिकन निवडणूका आणि त्यात डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेले अनपेक्षित यश आणि दुसरी म्हणजे अचानक ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय. या निर्णयामुळे भारतीय सोशल मीडियावर मोदी चांगलेच ट्रेंडमध्ये होते. आता या गोष्टीला एक आठवडा उलटला तरी सोशल मीडियावर आलेली ही मोदी लाट काही कमी झाली नाही त्यामुळे फेसबुकवरच्या सोशल ट्रेंडमध्ये आठवडा उलटूनही नरेंद्र मोदी अव्वल आहेत.

मोदींची चर्चा फक्त येथे भारतात सुरू आहे असे नाही तर एक दिवसांपूर्वी अमेरिकेच्या सोशल मीडियावरही नरेंद्र मोदी अव्वल होते. दुस-या देशात तेही निवडणुकांचे वारे नुकतेच शमले असताना एखाद्या देशाच्या पंतप्रधानांची चर्चा पाहायला मिळणे असा योग जरा दुर्मिळच. डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या निवडणूका यासारखे ट्रेंड हे दुस-या तिस-या स्थानावर होते आणि मोदी यांच्या धाडसी निर्णयाची चर्चा तिकडेही सुरू होती. नरेंद्र मोदी यांचे ट्विटर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. देशात सर्वाधिक फॉलोअर्स असणा-या यादीत मोदी हे अव्वल स्थानावर आहेत. पण नोट बंदीच्या या निर्णयामुळे दुस-या दिवशी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी मोदींना एका दिवसात तब्बल तीन लाख जणांनी अनफॉलो केले होते. पण असे असले तरी सोशल मीडियावर मोदींना मिळणारी प्रसिद्ध तसूभरही कमी झाली नाही असेच दिसते.