काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री सीबीआयने राहत्या घरुन अटक केली. चिदंबरम यांना अटक करुन सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. चिदंबरम यांच्या अटकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा पहायला मिळत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एका कार्यक्रमात मोदींनी दिलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मोदी पुन्हा एकदा निवडून दिल्यास जामीनावर बाहेर असणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं आश्वासन देताना दिसतात.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही व्हायरल झालेला मोदींच्या ‘मै भी चौकीदार’ कार्यक्रमातील भाषणाचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओ क्लिपमधील भाषणात मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. “२०१४ लाही मी सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना पै अन् पै परत करावी लागणार आहे. तुम्ही पाहिलचं असेल की २०१४ पासून (भ्रष्टाचाराच्या प्रकरणांबद्दलच्या) अनेक गोष्टी एकत्र करण्याचे काम केले आहे. आधीच्या सरकारबरोबर काम केलेले जुने अधिकारी निवृत्त होऊन नवे अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यामुळे माझे काम हळूहळू सोपे झाले आहे. नव्या अधिकाऱ्यांच्या हाती काही कागदपत्रे लागली आहेत. २०१४ पासून आतापर्यंत मी तुमच्या मदतीने या लोकांना तुरुंगांच्या दारापर्यंत तर आणलं आहे. कोणी जामिनावर आहे तर कोणी न्यायलयाकडून तारखा घेत आहे तर काही आजही न्यायलयाच्या फेऱ्या मारत आहेत,’ असं मोदी या भाषणात म्हणताना दिसतात. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी ‘२०१४ पर्यंत मी अनेकांना तरुंगाच्या तोंडापर्यंत आणले आहे. पण २०१९ नंतर…’ असं अर्धच वाक्य म्हणत तुरुंगात टाकणार असा हातानेच इशारा केल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, बुधवारी २७ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अटक करण्यात आल्यानंतर चिदंबरम यांना संपूर्ण रात्र सीबीआयच्या कार्यालयातच काढावी लागली. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसने आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन सरकारने अशा पद्धतीने एका माजी केंद्रीय मंत्र्याला आणि अर्थतज्ज्ञाला अटक करुन लोकशाहीचा खून केल्याची टिका केली आहे.