नवी मुंबईत पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून एका तरूणीचे प्राण वाचवले आहेत. वाशी खाडीमध्ये उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या २१ वर्षीय तरूणीचे प्राण वाहतूक पोलिसांनी वाचवले आहेत. मंगळवारी (२३ जुलै) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाशी खाडी पुलावर ही घटना घडली.

२१ वर्षीय कुसलूम खान वाशी खाडी पुलावर आपल्या नवऱ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलत होती. फोनवरच दोघांमध्ये वाद सुरू होता. वाद ऐवढा विकोपाला गेला की कुसलूमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तरूणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी प्रसंगावधान राखत याची माहिती सहकाऱ्यांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिस हवालदार सूर्यकांत बारस्कर, शिवाजी बसरे आणि दर्शन म्हात्रे यांनी कुसलूमला वाचवण्यासाठी खाडीत उडी मारली आणि तिला जीवदान दिलं. प्राण वाचवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कुसलूमला वाशी पोलिसांच्या स्वाधीन केलं. कुसलूम ही चेंबूरमधील विष्णुनगर येथील रहिवासी आहे. शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. कुसलूमला जीवदान देणाऱ्या पोलीस हवालदारांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.