News Flash

करोनाचा उपचार घेताना एकांतवास कसा घालवतात, ही फेसबुक पोस्ट नक्की वाचा

धनंजय मुंडेंच्या खासगी सचिवांची फेसबुक पोस्ट व्हायरल

संग्रहित (सौजन्य- फेसबुक)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या संपर्कातील काही जणांनाही करोनाची लागण झाली आहे. यामध्ये त्यांचे खासगी सचिव डॉ प्रशांत भामरे यांचाही समावेश आहे. प्रशांत भामरे यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रशांत भामरे रुग्णालयात असतानाही आपल्या प्रकृतीकडे योग्य लक्ष देत आहेत. यासाठी आपल्याला नेमकी प्रेरण कुठून मिळत आहे याबद्दल त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. करोनाची लागण झाल्याने अनेकजण सध्या एकांतवासात असून या निमित्ताने ही फेसबुक पोस्ट नक्की वाचली पाहिजे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये

पॅपिलॉन, सॉलिटरी कनफाईनमेन्ट आणि मी
खुप पुर्वी म्हणजे सुमारे २४-२५ वर्षापूर्वी कॉलेजला असताना हेन्री शरियरची पॅपिलॉन वाचली होती. त्यातला नायक पॅपिलॉन हा १८-१९ वर्षांचा फ्रेंच तरुण, त्याला तो निर्दोष असतानाही एका गुन्ह्यात न्यायव्यवस्था दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावते. मग तत्कालीन व्यवस्थेनुसार (अत्यंत अमानवीय आणि बदनाम फ्रेंच पिनल सिस्टिम) त्याला लॅटिन अमेरिकेतील फ्रेंच गियाना या वसाहतीच्या डेविल्स आयलँडवर नेलं जात. फ्रान्सपासुन हजारो मैल दूर असलेल्या या ठिकाणी तो सतत एकाच विचारात आणि प्रयत्नात असतो तो म्हणजे तुरुंगातून पळ काढुन फ्रान्सला परत जाणे. यासाठी तो सात प्रयत्न करतो. पहिल्या प्रयत्नात वेस्ट इंडीज बेटांपर्यंत जाण्यात यशस्वीसुद्धा होतो, परत पकडला जातो आणि परत फ्रेंच गियानात आणला जातो.

परत काही काळाने तो दुसरा प्रयत्न करतो. असं तो सतत करत राहतो आणि शेवटी सातव्या प्रयत्नात यशस्वी होतो. एकदा तर तो पळुन गौजिरा नावाच्या कोलंबियाच्या प्रांतात जातो तिथे समुद्रकाठी असलेल्या एका कोळ्यांच्या स्वर्गसमान वस्तीत जातो. तिथे दोन मुलींशी लग्न करतो, वर्ष दोन वर्ष राहतो, परत आपला बदला पूर्ण करण्यासाठी तिथुन निघतो ते परत पकडला जातो आणि त्याला परत फ्रेंच गियानात आणतात. असे हे कथानक १९३१ ते १९४५ अशा १४ वर्षात घडते.

शेवटी तो सातव्या प्रयत्नांती यशस्वी होतो. त्याचा बदला पूर्ण करतो आणि व्हेनेझुएलात सेटल होतो. अशी अत्यंत भन्नाट आणि इन्स्पायरिंग कादंबरी आहे. त्यावर चित्रपटही निघाला होता पण कादंबरीच्या पायाच्या नखाचीसुद्धा त्याला सर नव्हती. सांगायचं मुद्दा असा आहे की या कादंबरीत या पॅपिलॉनला एकदा पळून गेल्यावर परत पकडून आणतात आणि त्याची शिक्षा म्हणून त्याला आठ वर्षाची सॉलिटरी कान्फाइनमेंटची शिक्षा सुनावली जाते. हि शिक्षा म्हणजे फार भयानक प्रकरण असते. यात एका इमारतीत आठ बाय सहाचे सेल केलेले असतात, त्यात कैद्याला ठेवलं जात. एकदा त्याला आत घातलं कि शिक्षा संपेपर्यंत त्याला बाहेर काढलं जात नाही. कोठडीतून कोणीही दिसत नाही कोणाशी बोलणं होत नाही. दर दिवशी एकदा दरवाजाला असलेली एक छोटं खिडकी उघडली जाते त्यातून कैद्याला एक पाणी आणि जेवणाची बदली आणि मलमूत्रासाठी एक रिकामी बदली दिली जाते. अश्या परिस्थितीत कैदी वेडाने मरतात.

पॅपिलॉनला जेव्हा आठ वर्षांसाठी हि शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याच्यासोबतच एक वयोवृद्ध कैदी त्याला सांगतो की त्या नरकातून आठ वर्षानंतर जिवंत बाहेर येणे अशक्य आहे, आतापर्यंत जास्तीत जास्त दोन वर्षाचा रोकॉर्ड आहे. त्यामुळे तू आता तुझं बघ कस करायचं ते. पॅपिलॉनला लक्षात येतं कि आठ वर्ष एकांतवासात राहून शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम राहायचं असेल तर काहीतरी क्लुप्ती लढवावी लागेल. मग तो आत गेल्यावर एक शक्कल लढवतो. आठ फूट लांब असलेल्या त्या सेलमध्ये तो चालायला सुरवात करतो, चालताना पावले मोजतो. दरवाजापासुन भिंतीपर्यंत, वन, टू, थ्री, फोर…..ऐट अबाऊट टर्न, परत वन, टू, थ्री, फोर…..ऐट. असं तो दमेपर्यंत करतो, दमला कि झोपतो उठला कि परत वन, टू, थ्री, फोर…..ऐट. आणि ही शक्कल काम करते तो आठ वर्षेनंतरही तितक्याच भक्कमपणे त्या भयानक एकांतवासातून बाहेर येतो.

सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर बारा बाय पंधराच्या कक्षात दररोज सकाळी मॉर्निग वॉक कसा करावा हा प्रश्न होता, तेव्हा पॅपिलॉनची आठवण झाली आणि माझ्या कक्षातील दरवाजापासून ते भिंतीपर्यंत सुरु केलं एक, दोन तीन चार पाच सहा….. नऊ, अबाऊट टर्न …. आणि चक्क सहा किलोमीटरचा वॉक पूर्ण केला अगदी फ्रेश वाटलं. थँक यु पॅपिलॉन, थँक यु हेन्री शरियर सर !!!!

दरम्यान धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते लवकरच बरे होऊन पुन्हा सक्रीय होतील असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 7:42 pm

Web Title: ncp dhananjay munde pa prashant bhamre facebook post sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जीममध्ये भूत व्यायाम करत असल्याच्या चर्चेने पोलीस हैराण, काय आहे नेमकं सत्य ?
2 सोशल मीडियावर ट्रेंड झाला ‘पराठा’; आनंद महिंद्रा म्हणातात, “जुगाडू वृत्तीतून…”
3 शून्य ते १८ लाख, पॉर्न इंडस्ट्रीकडे वळलेल्या या सुपरकार रेसरची सहा दिवसांतील कमाई
Just Now!
X