News Flash

VIDEO: ‘कोण आला रे.. कोण आला.. मोदी शहाचा बाप आला’च्या घोषणा देत पवारांचे साताऱ्यात स्वागत

उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पवार पहिल्यांदाच साताऱ्यात गेले असता त्यांचे जंगी स्वागत झाले

पवारांचे जंगी स्वागत

साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत विधानसभा निवडणुकीआधीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांनी दूर्लक्ष केल्याने पक्षाला गळती लागल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे पक्षामधील अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेची वाट धरल्याने अधिक पडझड होऊ नये या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच सातारा मतदारसंघाला भेट दिली. उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याने आता साताऱ्यामध्ये पवारांचेच वर्चस्व राहणार की उदयनराजे पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे महाराष्ट्राबरोबरच सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. भाजपा आणि राष्ट्रवादीने ही जागा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवली आहे. त्यातच आता २१ तारखेला म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच साताऱ्यात पोटनिवडणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळेच येथे दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. सोशल मिडियावरही दोन्ही पक्षांचे समर्थक प्रचारात गुंतल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे सातारा दौऱ्यात असताना तरुणाईने त्यांचे कशाप्रकारे स्वागत केले हे दिसून येत आहे. ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशा घोषणा राष्ट्रवादीच्या समर्थकांनी दिल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार रविवारी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्य़ात आले होते. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रसतर्फे महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार पोहचले तेव्हा त्यांचे साताऱ्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीला हजारोच्या संख्येने राष्ट्रवादीचे समर्थक उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेमध्ये पवारांवर टीका केली होती. त्याआधी केंद्रीय मंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनाही ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ असा सवाल आपल्या भाषणामधून उपस्थित केला होता. या टिकेला पवारांनी उत्तर दिले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी आणि शाह यांना लक्ष्य करत पवारांचे स्वागत करताना ‘कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला’ अशी घोषणाबाजी केली.

रविवारी झालेल्या या रॅलीमध्ये बोलताना शरद पवार यांनी “पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. तसेच ‘दिल्ली दरबारात झालेला अपमान सहन न झाल्याने तख्त लाथाडून इतिहास घडविणारे व आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवणारे छत्रपती कुठे आणि सत्तेसाठी लाचारी पत्करणारे आत्ताचे त्यांच्या गादीचे वारस कुठे. त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन हे बरं नव्हं,’ अशा शब्दांमध्ये उदयनराजे भोसले यांना टोला लगावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:40 pm

Web Title: ncp supporters gave grand welcome to sharad pawar in satara scsg 91
Next Stories
1 “असे पत्रकार तुम्हाला कुठे सापडतात”? ट्रम्प यांच्या प्रश्नाने इम्रान खान यांची गोची
2 वृद्धांना मोफत सेवा देणाऱ्या प्लंबरसाठी नेटकऱ्यांनी जमवले 70 लाख
3 पेब किल्ल्यावरुन ५०० फूट खाली कोसळूनही मृत्यूच्या दाढेतून परतला ट्रेकर
Just Now!
X