राज्यात गेल्या आठवड्याभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. इथलं चित्र कोणत्याही संवेदनशील मनाचा थरकाप उडवणारं आहे. यावेळी उध्वस्त झालेले संसार, हवालदिल झालेल्या लोकांचा आक्रोश, आपल्या जवळच्यांच्या जाण्यानं सुन्न झालेली मनं आणि कित्येक जीवांची परवड संपूर्ण देशाने पाहिली. मात्र, या बिकट स्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे आल्यानं वेळोवेळी माणुसकीचं दर्शन आपल्याला घडत राहिलं. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली. एनडीआरएफच्या जवानांचा पूरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

कोल्हापुरातील पूरग्रस्त भागात नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या अर्थात एनडीआरएफच्या जवानांनी एका हॉटेलच्या छतावरुन एका कुत्र्याला वाचवलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर असंख्य मनं जिंकत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सर्वप्रथम हा व्हिडीओ शेअर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी भागातला हा व्हिडीओ आहे. सर्वत्र साचलेल्या पुराच्या पाण्यातून कसा तरी आपला बचाव करत एका हॉटेलच्या छतावर जाऊन बसलेल्या या मुक्या जनावराला एनडीआरएफच्या जवानांनी वाचवलं आणि सुरक्षित स्थळी हलवलं. यावेळी एनडीआरएफच्या जवानांपैकी एक जण छतावर चढला. अशा स्थितीत तो कुत्रा कित्येक तास भुकेनं व्याकुळ आणि बिथरला असल्याची शक्यता असल्यानं सर्वप्रथम त्यांनी त्याला गोंजारलं, मायनं जवळ घेतलं. त्यानंतर त्याला खाऊ घातलं आणि मग आपल्यासोबत सुरक्षित स्थळी नेण्यासाठी ते सर्वजण त्याला घेऊन निघाल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

कोल्हापुरातील ‘या’ घटनेचा व्हिडीओ पाहाच!

विचार करा, ज्या संकटात माणसांची इतकी बिकट अवस्था झाली तिथे या मुक्या जनावरांचं काय झालं असेल? मोठ्या मायेनं वाढवलेली, जीवापाड जपलेली कित्येकांची गुरं, जनावरं त्यांच्या नजरेदेखत वाहून गेली आणि ते दृश्य असहाय्यपणे पाहण्याशिवाय अनेकांच्या हातात दुसरं काहीच उरलं नाही. या संपूर्ण मदत आणि बचाव कार्यादरम्यान प्रयत्नांची शर्थ करूनही कित्येक दुर्दैवी घटना घडल्याच. मात्र, या सगळ्यात कोल्हापुरातील एनडीआरएफच्या जवानांच्या या व्हिडीओत दिसणाऱ्या आणि अशा अन्य अनेक घटनांमुळे माणुसकीची जिवंत उदाहरणं पाहायला मिळाली.

माणुसकीचं मलम!

राज्यात गेल्या आठवड्याभरात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नागरिकांना मोठ्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसानं सर्वाधिक नुकसान केल्याचं पाहायला मिळालं. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. होतं नव्हतं ते सगळंच वाहून गेलं म्हटल्यावर संसार पुन्हा उभारायचे कसे? या प्रश्नाने लोक अक्षरशः हवालदिल झाले आहेत. जे राहिलं ते आपलं मानून आयुष्याची सगळी घडी पुन्हा बसवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. अशा परिस्थितीत आपली खंभीर साथ आणि माणुसकीचं मलमच ही परिस्थिती निभावून नेईल.