आपण आजवर अनेक दिग्गज लोकांच्या घटस्फोटाच्या बातम्या ऐकल्या आहेत. पण कधी एखादी महिला घटस्फोट घेऊन रातोरात अरबपती झाल्याचे ऐकले आहे का? नुकताच आशियामध्ये एक महिला घटस्फोटानंतर मिळालेल्या पोटगीमुळे रातोरात अरबपती झाल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये वॅक्सीन बनवणारी कंपनी शेंझेन कंगटाय बायोलॉजिकल प्रॉडक्टस कंपनीचे अध्यक्ष ड्यू वेइमिन (Du Weimin) यांनी पत्नीला घटस्फोट दिला आहे. घटस्फोटानंतर पोटगी म्हणून त्यांनी पत्नी युआन लिपिंग (Yuan Liping)ला कंपनीचे १६१.१३ कोटींचे शेअर्स दिले आहेत. त्यामुळे युआन यांचा जगभारतील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी या शेअर्सची किंमत ३.२ अरब डॉलर (म्हणजेच अंदाजे २४ हजार ५७ कोटी ४४ लाख रुपये) होती. ड्यू यांच्याकडे एकूण ६.५ मिलियन इतकी संपती होती. पण एकूण संपतीचा समभाग पत्नीच्या नावे केल्यामुळे आता त्यांच्याकडे जवळपास ३.१ अरब डॉलर (म्हणजे २३ हजार कोटी) इतकी संपती आहे.

५६ वर्षीय ड्यू यांचा जन्म चीनमधील जियांग्शी ( Jiangxi) प्रांतामधील एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांनी कॉलेजमध्ये रसायन शास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये एका क्लिनिकमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि १९९५ मध्ये ते बायोटेक कंपनीचे सेल्स मॅनेजर झाले. २००९मध्ये ते कंगटाय कंपनीचे अध्यक्ष्य झाले.

यापूर्वी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक जेफ बेजोस यांनी पत्नीला घटस्फोटाच्या वेळी पोटगी म्हणून सर्वात मोठी रक्कम देऊ केली होती. त्यांनी पत्नी मॅकेंजीला २.६२ लाख कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. त्यानंतर मॅकेंजी जगातील सर्वात श्रीमंत महिल्यांच्या यादीमध्ये सहभागी झाल्या होत्या.