नुकत्याच पार पडलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना जितका उत्कंठावर्धक होता, सामना संपल्यानंतर त्यावरुन वाद देखील तितकेच निर्माण झाले. दोन वेळेस सामना बरोबरीत सुटल्यानंतरही सर्वाधिक चौकारांच्या आधारे विजेता घोषीत करण्याच्या आयसीसीच्या नियमावर अनेकांनी टीका केली. हा निमय बदलण्याची मागणी देखील काही माजी खेळाडूंनी केली होती. या नियमाचा फटका बसलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने मात्र यावर कोणतीही वादग्रस्त प्रतिक्रिया न देता निकाल मान्य केला, पण त्यांच्या देशातील अन्य क्रीडाक्षेत्रात चटका लावणाऱ्या त्या पराभवाची आठवण नेहमीच राहील असं दिसतंय.

विशेषतः आयसीसीच्या नियमांविरोधात येथील काही जणांच्या मनात अद्यापही राग असल्याचं दिसत आहे. याचं उत्तम उदाहरण समोर आलं ते म्हणजे रग्बीच्या फ्रिडम कप स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना दोन दिवसांपूर्वी पार पडला. या सामन्याचाही निकाल लागू शकला नाही आणि सामना अखेरीस 16-16 असा बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय झाला. यानंतर ‘ऑल ब्लॅक्स’ या न्यूझालंडच्या राष्ट्रीय रग्बी संघाने ट्विटरद्वारे आयसीसीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘चौकार मोजायची गरज नाही…सामना बरोबरीत सुटला म्हणजे ड्रॉ..’ अशाप्रकारचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटवर न्यूझीलंडच्या देशवासियांनी आणि अन्य खेळाडूंनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण यामुळे पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकात जिंकण्याची संधी गमावल्याचं दुःख न्यूझीलंडच्या खेळाडूंना अद्यापही असल्याचं स्पष्ट होत आहे.

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना टाय झाला होता. दोन्ही संघांनी निर्धारीत षटकात 241 धावा केल्या होत्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्येही निकाल लागू शकला नव्हता, त्यामुळे सर्वाधिक चौकार मारल्याच्या निकषावरुन इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आलं होतं.