गेल्याच आठवड्यात चीनमधल्या एका कुटुंबानं घरातील एका मृत व्यक्तीला त्याच्या आवडत्या गाडीसह दफन केलं होतं. माझा मृतदेह शेवपेटीत न ठेवता तो गाडीत ठेवून मगच दफन करावा असं त्यानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं. ही गोष्ट ताजी असताना नायजेरियामधील एका व्यावसायिकानं आपल्या वडिलांसाठी नव्या कोऱ्या BMW चीच शेवपेटी केली. कोट्यवधी किंमतीच्या नवीन गाडीत त्यानं वडिलांचा मृतदेह ठेवला आणि मृतदेहासह ती गाडी दफन केली.

एका फेसबुक पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात तो व्हायरल झाला आहे. मुलानं आपल्या वडिलांसाठी आलिशान गाडीचा शवपेटी म्हणून वापर केला गेल्याची ही कदाचित पहिलीच घटना असेल म्हणूनच सोशल मीडियावर याची खूपच चर्चा सुरू आहे. पण अनेकांनी या व्यावसायिकावर टीकाही केली आहे. मृतदेहासह आलिशान गाडीचं दफन करणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे. या पैशांत कित्येक गरिबांचं भलं झालं असतं असंही म्हणत अनेकांनी त्याच्यावर सडकून टीका केली आहे.