चित्रपटात आतापर्यंत आपण अनेकवेळा अक्षय कुमार, टॉम क्रूझ या नायकांना विमानाच्या मागे पळताना पाहिले आहे. प्रेयसीसाठी किंवा खलनायकाला पकडण्यासाठी म्हणून ते विमानाच्या मागे धावतात. त्यात विमानाचे उड्डाण रोखण्यात ते यशस्वी सुद्धा होतात. तुम्हाला वाटत असेल अशा गोष्टी फक्त चित्रपटातच घडतात. पण नायजेरीयात एका माणसाने चित्रपटात दाखवात तसाच प्रयत्न केला.

विमान टेकऑफसाठी सज्ज असताना हा माणूस थेट विमानाच्या पंखावर चढला व तिथून विमानाच्या केबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कोणालाही पकडायचे नव्हते. नायजेरीयात लागोसमध्ये मुरताला इंटरनॅशनल एअरपोर्टवर १९ जुलैला ही घटना घडली. विमानातील एक प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला.

मागच्या ३० मिनिटांपासून आम्ही एमएमआयएच्या धावपट्टीवर अडकून पडलो आहोत. एक जण बॅग घेऊन विमानाच्या पंखावर चढला आहे. इमर्जन्सी आहे असे कॅप्शन त्याने दिले होते. सुरक्षा रक्षक अजून दिसले नसून भितीचे वातावरण आहे. मला भरपूर प्रश्न विचारायचे आहेत पण आता मी श्वासही घेऊ शकत नाहीय. हे योग्य यंत्रणांपर्यंत पोहोचवा असे कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते.

त्यानंतर या माणसाने पुढे काय घडलं त्याचे अपडेट दिले आहेत. त्या माणसाला अखेर अटक झाली असून आम्हाला सर्वांना विमानातून खाली उतरवण्यात आले आहे असे पुढच्या इन्स्टा मेसेजमध्ये लिहिले आहे. उस्मान आदामू असे विमानाच्या पंखावर चढणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. फेडरल एअरपोर्ट ऑथोरीटी ऑफ नायजेरीयाने टि्वटरवरुन ही माहिती दिली आहे. त्याने हे पाऊल का उचलले ते अजून स्पष्ट झालेले नाही.