जगभरात लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या करोना महमारीच्या संकटातही, काही सहानुभूती व प्रेमाच्या छोट्या घटनांमुळेही एका चांगल्या भविष्याची आशा निर्माण होते. याच पार्श्वभूमीवर एक हृदयस्पर्शी असा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, तुफान व्हायरल होत आहे.

काशी विश्वनाथ, वाराणसी येथे रात्रपाळीवर असलेला एक पोलीस कर्मचारी रात्री भटकत असलेल्या व तहानलेल्या श्वानाची तहान भागताना यात दिसत आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने हातपंपाद्वारे पाणी पाजून त्या श्वानाची तहान भागवली. हा हृदयस्पर्शी क्षण टिपणारा फोटो पोलीस मीडिया न्यूजच्या ट्विटर अकाउंटवर सर्वप्रथम शेअर करण्यात आला व त्यानंतर आता तो तुफान व्हायरल होत आहे.

या फोटोची पोस्ट नंतर आयपीएस अधिकारी सुकीर्ती माधव यांनी शेअर केली. तसेच, त्यांनी आपल्या पोस्टसोबत पाताल लोक या वेबसीरीज मधील एक संवाद देखील ट्विट केला, “जर एखाद्या माणसाला श्वान आवडत असतील तर तो चांगला माणूस आहे. जर श्वानांना एखादा माणूस आवडत असेल, तो चांगला माणूस आहे! अत्युल्य बनारस..!”

ही पोस्ट शेअऱ झाल्यापासून तिला २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून, हा फोटो मोठ्याप्रमाणावर शेअर होत आहे. शिवाय, अनेकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे तहानलेल्या श्वानाला पाणी पाजल्याबद्दल कौतुक केलं आहे. कृतीतून चांगुलपणा व मानवतेचा प्रत्यय, देव पोलीस कर्मचाऱ्यास व त्याच्या कुटुंबास आशीर्वाद देवो. अशा प्रकारे भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.