20 November 2019

News Flash

आता रेल्वे स्थानकांवर ‘बिल न मिळाल्यास जेवण फुकट’, पियूष गोयल यांची माहिती

'खाद्यान्न विक्रेत्यांनी ग्राहकाला बिल न दिल्यास जेवण फुकट' असं नवं धोरण भारतीय रेल्वेने अवलंबलं आहे

भारतीय रेल्वेने नुकतेच खासगीकरणाकडे पाऊल टाकले असून दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. अशातच रेल्वेने सोयीसुविधा सुधारण्यावरही भर दिला आहे. यानुसार रेल्वे स्थानकांवरील ‘खाद्यान्न विक्रेत्यांनी ग्राहकाला बिल न दिल्यास जेवण फुकट’ असं नवं धोरण भारतीय रेल्वेने अवलंबलं आहे.


केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली आहे. रेल्वेत पुरविली जाणारी जेवण व्यवस्था पारदर्शक व्हावी, या उद्देशाने हा नवीन बदल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये विक्रेत्याने खाद्यान्नाचं बिल देणे अनिवार्य आहे. जर विक्रेत्याने बिल देण्यास नकार दिला तर त्याला पैसे देण्याची आवश्कता नाही, अशावेळेस तुमचं खाणं मोफत असेल’ अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. प्रवाशांना गैरसोयीची तक्रार नोंदवण्यासाठी आणि मदतीसाठी एक हेल्पलाईन क्रमांक देखील जारी केला जाणार आहे.

प्रवाशांना निकृष्ट दर्जाचं जेवण आणि ठरावीक किंमतीपेक्षा अधिक दर आकारण्याची अनेक प्रकरणं वारंवार समोर आली. मात्र, बिल नसल्यामुळे विक्रेत्यांवर ठोस कारवाई करता येत नाही. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. यानुसार कोणताही विक्रेता बिल नसेल तर ग्राहकाकडे पैशांची मागणी करु शकत नाही. अशावेळेस ग्राहकासाठी खाद्यान्न मोफत असतील असे आदेश रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत.

First Published on July 9, 2019 9:19 am

Web Title: no food bill no payment on railway stations says piyush goyal sas 89
Just Now!
X