नोव्हेंबर आल्यावर जशी थंडीची चाहूल लागते तशीच मागील काही वर्षांपासून चाहूल लागते ती ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची. मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करण्याचा ट्रेण्ड वाढताना दिसत आहे. समाज माध्यमांचा वापर मागील काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच परदेशातील अनेक कल्पना या समाज माध्यमांवरून व्हायरल होत आपल्याकडे रुजतात आणि वाढतात. मागील काही वर्षांपासून सात्यत्याने अशीच वाढत गेलेली संकल्पना म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’.

आपल्याकडे समाज माध्यमांवर व्हायरल झालेली गोष्ट म्हणून एखादा ट्रेण्ड फॉलो केला जाते. मात्र त्यामागील मूळ उद्देश काय आहे हे खूपच कमी जणांना ठाऊक असते. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेण्ड नसून ती एक सामाजिक मोहीम आहे. परदेशात मागील अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. यामागे पुरुषांचे आरोग्य आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जगरूकता निर्माण करण्याचा हेतू आहे.

१९९९ साली ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळू लागतात. तर चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सरसंदर्भातील मोहिमेला दान करायचे. हे पैसे कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांना दान करण्याच्या हेतूने ही मोहीम राबवली जाते. चेहऱ्यावरील केस महिन्याभरासाठी वाढू देऊन प्रतीकात्मकतेच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांबद्दल सहानभूती व्यक्त करण्याच्या या प्रयत्नाला २००४ पासून मोव्हेंबर हे नाव देण्यात आले. यातलं मो म्हणजे मुस्टॅचेस म्हणजेच मिशा आणि व्हेंबर हे नोव्हेंबर महिना दर्शवणारे शब्द एकत्र करून हा शब्द शोधण्यात आला. या मोहिमेने कॅन्सरच्या रुग्णांबरोबरच पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांसंदर्भातही काम सुरू केले. या मोहिमेसंदर्भातील सर्व माहिती no-shave.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मात्र अनेकांना हा खरा उद्देश ठाऊक नसला तरी इंटरनेटमुळे फॅशन ट्रेण्ड म्हणून ‘नो शेव नोव्हेंबर’ साजरा करणाऱ्यांची संख्या वाढलीय हे विशेष. आता या परदेशी श्रावणाची मज्जा सोशल मीडियावर अगदी डिसेंबपर्यंत टिकून राहील यात शंका नाही.

भारतातील समाज माध्यमांवर दर वर्षी या मोहिमेसंदर्भातील विनोद व्हायरल होतात. यामध्ये अगदी आता दिवाळीतील शेव खाता येणार नाही पासून ते दाढीनंतरचा म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीचा आणि दाढी वाढवल्यानंतरचा म्हणजे ३० नोव्हेंबरचा फोटो अशा अनेक पोस्ट व्हायरल होतात.

अर्थ समजून न घेता फॉलो केली जाणारी ही काही एकमेव मोहीम नाही. मध्यंतरी डोक्यावर बर्फाचे पाणी ओतून घेणारे आइस बकेट चॅलेंज चांगलेच व्हायरल झालेले. मात्र या मोहिमेमागील मूळ उद्देशाला बगल देत मज्जा म्हणून अनेकांनी थंड पाणी डोक्यावर घेण्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केलेले. यात मग अगदी सामान्यांपासून ते क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठय़ा व्यक्तींचा समावेश होता. मुळात मेंदूसंदर्भातील एएलएस या आजारावर संशोधनासाठी निधीसंकलन करण्यासाठी ‘एएलएस आइस बकेट चॅलेंज’ची संकल्पना सुरू करण्यात आली होती. मात्र बादलीभर पाणी ओतून घेण्याच्या या ट्रेण्डमुळे अनेक नवीन आणि समाजोपयोगी ट्रेण्ड त्यानंतर आले हेही तितकेच खरे. म्हणजे राईस बकेट चॅलेंज म्हणजे गरिबांना एक बादली तांदूळ दान करणे किंवा बुक बकेट चॅलेंज म्हणजे एका बादलीत बसतील इतकी पुस्तके दान करण्यासारखे अभिनव उपक्रम अनेकांनी राबवले.

याचप्रमाणे २०१३ साली प्रोजेक्ट सेमिकोलन या मोहिमेचाही जन्म झाला. या मोहिमेअंतर्गत अनेकांनी शरीरावर सेमिकोलनचा टॅटू काढून घेणे अपेक्षित होते. या सेमिकोलनच्या माध्यमातून डिप्रेशन असणाऱ्यांना, मनात आत्महत्येचे विचार येणाऱ्यांना, स्वत:ला इजा करून घेण्याची वृत्ती असणाऱ्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून प्रेम आणि सद्भावना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा या मोहिमेचा हेतू होता.

सामाजिक भान जपणाऱ्या अशा अनेक गोष्टी वारंवार व्हायरल होत असतात, मात्र दुर्दैवाने आधी त्या व्हायरल होतात आणि मग त्यामागील कारण लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळेच आधी मोहिमेचा हेतू लोकांपर्यंत पोहोचवून त्यानंतर ती व्हायरल केल्यास जास्तीत जास्त गरजूंना तिचा फायदा होईल.
स्वप्निल घंगाळे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा