सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनाशी लढण्यासाठी अनेक देश शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशी एकही व्यक्ती नसेल ज्याला करोनाबाबत कल्पनाही नसेल. परंतु ज्यांना करोनाबाबत माहितच नाही अशा व्यक्ती सापडल्या तर… होय अगदी खरंय. एलेना मनीगेट्टी आणि रायन ओसबोर्न अशी या दोघांची नावं आहेत. २०१७ मध्ये या दोघांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर या दोघांनी एक बोट विकत घेतली आणि जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही आपल्यासोबत संपर्कात राहण्याची विनंती केली. परंतु यासाठी त्यांनी कुटुंबीयांना एक अटही घातली आणि ती म्हणजे कोणतीही वाईट बातमी द्यायची नाही.

हे दोघंही मॅन्चेस्टरचे रहिवासी आहेत. गेल्या महिन्यात त्या दोघांनी कॅनेरी बेटापासून अटलांटीक महासागरात कॅरेबिअन बेटांपर्यंतचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रवास सुरू झाल्यानंतर लगेचच दुसरीकडे करोनाचाही प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत होता. परंतु या दोघांनाही त्याची कल्पना नव्हती. या २५ दिवसांमध्ये त्यांनी बाहेरच्या जगाशीही फार कमी संपर्क ठेवला होता. जेव्हा ते एका किनारपट्टीवर पोहोचले त्यावेळी त्यांच्या फोनमध्ये नेटवर्क मिळालं. त्यावेळी त्यांना त्या बेटाच्या सीमा बंद केल्याची माहिती मिळाली. तसंच जगात करोनासारख्या आजारानं थैमान घातल्याचंही समजलं.

“आम्ही फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये एक व्हायरस आल्याची बाब ऐकली होती. आम्ही जेव्हा २५ दिवसांसाठी कॅरेबिअन बेटांपर्यंत जाऊन येऊ तोवर हे सर्व संपलेलं असेल असं आम्हाला वाटलं, अशी माहिती एलेनानं दिली. “जेव्हा आम्ही परतलो तेव्हा हे संपलं नसून या व्हायरचा प्रसार जगभरात झाल्याचं कळलं,” असं रायननं सांगितलं.

सीमा बंद

जेव्हा करोना व्हायरसची सुरूवात झाली होती तेव्हा हे जोडपं आपल्या दौऱ्यावर निघालं होतं. तसंच त्यांच्याकडे मर्यादित इंटरनेट आणि मित्र परिवार, तसंच कुटुंबीयांशीही अधिक संपर्क नव्हता. तसंच बाहेरच्या जगात या व्हायरसनं किती भीषण रूप धारण केलं याची कल्पनाही त्यांनी नव्हती. “आम्ही प्रथम कॅरिबियनमधील एका फ्रेंच प्रांतात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा आम्हाला सर्व सीमा बंद असल्याचं आणि बेटं ओस पडल्याचं जाणवलं,” अशी माहिती रायन म्हणाला.

त्यावेळीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे असं वाटलं. काही लोकांमुळे बेटावरील लोकांना संसर्ग व्हायला नको या भीतीने परवानगी नाकारण्यात येत असल्याचा त्यांचा समज झाला. त्यानंतर त्या दोघांनी पुढच्या प्रवासासाठी जाण्याचा निर्णय घेतला. एका ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना मोबाईलमध्ये ४ जी डेटा मिळाला. तसंच त्यांनी बाहेरच्या जगात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना माहिती मिळू लागली तेव्हा हा व्हायरस किती भीषण आहे याची कल्पना येऊ लागली. त्यानंतर सेंट विन्सेंट येथं असलेल्या त्यांच्या मित्राशी पोहोचण्याच्या काही तासांपूर्वी त्यांनी संपर्क साधला. परंतु एलेना इटालियन नागरिक असल्यानं तिला परवानगी नाकारण्यात येऊ शकते अशी माहिती तिला मिळाली. सुदैवानं हे जोडपं जीपीएस सिग्नलद्वारे त्यांच्या बोटीचा मागोवा घेत होते. तसंच त्यांच्या प्रवासाच्या इतिहासावरून त्यांनी महिन्याभरात इटलीचा प्रवास केला नसल्याचंही सिद्ध झालं. त्यानंतर त्यांना बाहेर येण्यास परवानगी मिळाली.

सध्या एलेना आणि रायन हे दोघंही सेंट विन्सेंट येथेच अडकले आहेत. आपल्याला अजून किती काळ या ठिकाणी राहावं लागेल याची कल्पना नसल्याचंही त्यांच म्हणणं आहे. जुनमध्ये चक्रीवादळ सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचायचं आहे. सध्या आमचं चक्रीवादळ आणि करोना या दोघांच्यामध्ये भरडलो जात असल्याचं त्यांनी सांगितलं.