जगभरात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. सर्वत्र आजकाल करोनाच्याच चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यातच काही जणांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. यांना करोनाची लागण झालेली नाही परंतु त्यांच्यावर होणाऱ्या टीकांमुळे त्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूर्वेकडील राज्यातील काही विद्यार्थ्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

काही लोकांकडून त्यांना चिंकी, नेपाळी, चायनीज, करोना व्हायरस असं संबोधलं जात असल्याचं सांगत त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी याबाबद एक व्हिडीओ शेअर करून असे प्रकार बंद करण्याचं आवाहनदेखील केलं आहे. दिमापुर २४*७ इन्स्टाग्राम या पेजवर शुक्रवारी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आम्हाला करोना, चिंकी, चायनीज म्हणणं बंद करा… नॉर्थ इस्ट स्टुडंट ऑफ पंजाब असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

या व्हिडीओमध्ये पूर्वेकडील राज्यातील काही विद्यार्थी संवाद साधत आहेत. “आम्ही पंजाबमधील छोटं गाव चुन्नी कला येथे राहतो. या ठिकाणी पूर्वेकडील राज्यांमधील जे विद्यार्थी आहेत, त्यांना काही लोक करोना व्हायरस म्हणून चिडवत आहेत. आम्हाला जाता येता अशा टीकेचा सामना करावा लागतो. आमचा चेहरा थोडा वेगळा आहे परंतु आम्ही भारतीय आहोत. करोना व्हायरस चीनमधून आला आहे. आम्ही चीनमधून आलेलो नाही,” असं विद्यार्थी त्यात म्हणताना दिसत आहेत.