आपल्यापैकी अनेकांचे ऑफिस व्हॉट्सअप ग्रुप असतात. अनेकदा या ग्रुपवर ऑफिससंदर्भातील चर्चा आणि प्लॅन्स ठरतात. त्यातही एक ऑफिशियल म्हणजे गंभीर विषयांवर चर्चा करण्यासाठी तर दुसरा अनऑफिशियल म्हणजेच टाइमापाससाठी. मात्र अनेकदा या दोन्ही ग्रुप्समध्ये बोलताना गोंधळ होतो आणि एखादी या ग्रुपची पोस्ट त्या ग्रुपवर जाते. अनेकदा अधिकृत ग्रुपवर बोलताना भान राहत नाही आणि मग मेसेज डिलीट करावा लागतो. पण काहीवेळेस बॉसने तो मेसेज वाचल्यास त्यावरुन मेसेज टाकणाऱ्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता असते. मात्र अनेकांच्या मते अशा ग्रुप्सवर शांत राहिलेलेच फायद्याचे असते कारण मेसेजच्या माध्यमातून ऑफिसच्या कामांबद्दल त्यातही बॉसबरोबर चर्चा करताना मेसेजचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता असते. ‘वीचॅट’ या मेसेजिंग अॅपवरील ऑफिस ग्रुपवर बोलताना केलेली अशीच एक चूक चीनमधील महिला कर्मचाऱ्याला खूपच महागात पडली. बॉसबरोबर बोलताना तिने स्मायली वापरून उत्तर दिल्याने संतापलेल्या बॉसने त्या महिलेला चक्क कामावरुनच काढून टाकले.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित महिला कर्मचाऱ्याने ‘वीचॅट’ या लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशच्या माध्यमातून बॉसशी संवाद साधत होती. त्यावेळी तीने बॉसने सांगितलेली गोष्ट मी करते हे सांगण्यासाठी ओके असा टेक्सट मेसेज न पाठवता इमोजी वापरुन ओके असं कळवलं. त्यामुळे संतापलेल्या बॉसने त्या महिलेला कामावरुन काढून टाकले. हुनान प्रांतातील चांग्शा येथील एका बारमध्ये ही महिला व्यवस्थापनासंदर्भात काम करते. या महिलेला बारच्या व्यस्थापकाने ‘वीचॅट’वरील ग्रुपवर कामाच्या बैठकीसंबधीचे कागदपत्र पाठवण्यास सांगितले. व्यवस्थापकाच्या या मेसेजला त्या महिलेने ओके सांगण्यासाठी हातांचा (आपण छान असं दर्शवताना वापरतो तो) इमोजी पाठवला. तिच्या या उत्तरावर त्या व्यवस्थापनाने महिलेला ग्रुपवर झापले. ‘तू कामासंदर्भातील मेसेजला लिहून उत्तर पाठवणे अपेक्षित आहे. तुला यासंदर्भातील नियम ठाऊक नाहीत का?, अशाप्रकारे एखाद्या मेसेजला उत्तर देतात का?’ असे प्रश्न ग्रुपवरच विचारले. त्यानंतर काही मिनिटांनी त्याच व्यवस्थापाने महिलेला कंपनीच्या एचआरशी संपर्क साधून राजीनामा देत आपल्या हिशेब करावा असं सांगितलं.

‘हो खरोखर मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. मला राजीनामा देण्यास सांगितला असून मी तो कंपनीकडे दिला आहे. मी येथे मागील अनेक वर्षांपासून काम करत आहे. मात्र अशाप्रकारचा मूर्खपणा वाटणारी घटना माझ्याबरोबर पहिल्यांदाच घडली आहे. मी शांत स्वभावाची असल्याने जास्त हुज्जत घालत न बसता राजीनामा दिला आहे,’ असं या महिला कर्मचाऱ्याने ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’शी बोलताना सांगितले आहे. या महिलेच्या सहकाऱ्यांनाही व्यस्थापकाने घेतलेली ही टोकाची भूमिका पटलेली नाही. तसेच या प्रकरणानंतर संबंधिक व्यवस्थापकाने ‘वीचॅट’ ग्रुपवर माझ्या मेसेजला उत्तर देताना ‘रॉजर’ ही संज्ञा वापरावी असं कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे.

या कंपनीच्या ‘वीचॅट’ ग्रुपवरील या संवादाचे स्क्रीनशॉर्टस चीनमधील सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग वेसाईट असणाऱ्या वीबोवर व्हायरल झाले आहे. अनेकांनी या व्यवस्थापकाला चांगलेच खडे बोल सुनावले असून त्याने घेतलेली भूमिका चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ‘नोकरीवरुन काढण्यासाठी बॉसला कोणतेही कारण पुरेस असते’ असं एका युझरने म्हटले आहे तर दुसऱ्या एक युझरने ‘बॉस एवढा मुर्ख असेल तर मी मेसेजला उत्तरच देणार नाही’ असं म्हटलं आहे. ‘चांगली नेतृत्व क्षमता असणारी व्यक्त त्याच्या ग्रुपमधील लोकांच्या संवादकौशल्यातील विविधतेचे कौतुक करेल’ असे मत एका वीबो युझरने व्यक्त केले आहे. मागच्या महिन्यातही चीनमधील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एका कर्मचाऱ्याला ‘वीचॅट’वर बोलण्याची शिस्त नसल्याचे कारण देत कामावरुन काढून टाकण्यात आले होते. या कर्मचाऱ्याने बॉसच्या मेसेजला ‘हम्म’ असे उत्तर दिले होते असं कंपनीने सांगितले होते.