रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी सर्वाधिक तक्रार करतात ती रेल्वेमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांची. अनेकदा लोकांना रेल्वेमध्ये मिळणारे खाद्य पदार्थ आवडत नाहीत. रेल्वेमध्ये मिळणारे पदार्थ तयार केले जाताना पुरेशी स्वच्छता बाळगली जात नाहीत, अशी समजूत असणाऱ्यांची संख्या तर लक्षणीय आहे. त्यामुळेच बहुसंख्य प्रवासी रेल्वेमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता राजधानी आणि शताब्दी ट्रेनमध्ये आवडते फास्ट फूड प्री-ऑर्डर करता येणार आहे. याआधी शताब्दी आणि राजधानी ट्रेन्समध्ये निश्चित करण्यात आलेले खाद्य पदार्थ मागवण्याचाच पर्याय उपलब्ध होता. मात्र आता शताब्दी आणि राजधानी ट्रेनमध्ये प्रवाशांना आवडते खाद्यपदार्थ प्री-ऑर्डर किंवा मेसेजच्या माध्यमातून मागवता येणार आहेत.

प्रवाशांच्या खाद्य पदार्थ विषयक गरजा लक्षात घेता भारतीय रेल्वेकडून डॉमिनोज, केएफसी, मॅकडॉनल्ड्ससोबत करार केला आहे. लुधियाना ते दिल्लीदरम्यान प्रवास करणारे डॉमिनोज आणि लुधियानातील ज्ञान व्हेजिटेरियन, बाबीबी फिश अँड चिकनमधून खाद्य पदार्थ मागवू शकतात. उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागात येणाऱ्या स्थानकांवरील प्रवासी केएफसी, मॅकडॉनल्डसारख्या ब्रँडमधून खाद्य पदार्थ मागवू शकणार आहेत. मात्र सध्या तरी या ब्रँडकडून खाद्य पदार्थांची डिलेव्हरी सुरु करण्यात आलेली नाही. प्रवाशांनी दोन तास आधी खाद्य पदार्थांसाठी ऑर्डर देणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे ऑर्डर करा खाद्य पदार्थ-
खाद्यपदार्थांची ऑर्डर करण्यासाठी प्रवाशाला http://www.ecatering.irctc.co.in या संकेतस्थळावर जावे लागेल. यानंतर ज्या रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थ हवा असेल, त्या रेल्वे स्थानकाची निवड प्रवाशाला करावी लागेल. स्थानकाची निवड केल्यावर त्या स्थानकावर उपलब्ध असलेल्या सर्व फूड जॉईंट्सची माहिती मिळेल. यानंतर प्रवासी त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांची निवड करुन ऑर्डर करु शकतात. यासाठी पैसे ऑनलाईन किंवा डिलेव्हरीच्या वेळी देण्याची सुविधा उपलब्ध आहे. मागील वर्षी राजधानी आणि शताब्दी ट्रेन्समध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता.