‘फेसबुक’वर मित्र-मैत्रिणींचे स्टेट्स अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, फनी व्हिडिओज, कोट्स हे तर प्रत्येकजण बघत असतोच. एकदा फेसबुक ओपन केले की न्यूज फिडमध्ये या सगळ्या गोष्टी प्रत्येक यूजरला दिसायला लागतात. पण आता या सगळ्यासोबत तुम्ही ‘फेसबुक’चा नोकरी शोधण्यासाठीही उपयोग करू शकणार आहात. सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिका आणि कॅनडामधील यूजर्ससाठीच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण पुढील काळात ती अन्य देशांमध्येही उपलब्ध करून देण्यात येईल.

ऑनलाईन विश्वातील अधिकाधिक यूजर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘फेसबुक’ने ही नवी सुविधा उपलब्ध करून दिलीये. जी लोक आजही ‘फेसबुक’पासून दूर आहेत. ते या निमित्ताने तरी या सोशल नेटवर्किंग साईटकडे वळतील आणि फेसबुकची प्रसिद्धी वाढेल, असा कंपनीचा हेतू आहे. नोकरीच्या शोधात किंवा काम मिळवण्याच्या शोधात असलेले यूजर्स आज अन्य लिंक्डइन किंवा मॉन्स्टर डॉट कॉम या सारख्या साईटकडे वळतात. तिथे स्वतःचे प्रोफाईल अपडेट करून यूजर्स नोकरीचा शोध घेत असतात. आता नोकरीच्या शोधासाठी इतर कोणत्याही साईटवर वेगळे प्रोफाईल तयार करण्यापेक्षा ‘फेसबुक’वरच्या प्रोफाईलमधूनही तुम्ही तु्म्हाला हवी असलेली नोकरी शोधू शकणार आहात.
दरम्यान, अशा पद्धतीने फेसबुकवर नोकरी शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयामुळे तेथील यूजर्सची वैयक्तिक माहिती धोक्यात आणण्यात आली आहे का, असा सवाल या क्षेत्रातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. लोकांना नवनव्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यूजर्सची वैयक्तिक माहिती पणाला लावणे कितपत योग्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्सवर यूजर्स नक्की काय करतात, कोणते विषय त्यांना वाचायला आवडतात, याचा सातत्याने फेसबुककडून आढावा घेतला जातो. आणि त्यातूनच मग नोकरी शोधण्याची सुविधा साईटवर उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला. अनेक जण नोकऱ्यांच्या शोधात असतात. त्यांना या सुविधेचा उपयोग होईल, हे लक्षात आल्यावर पहिल्या टप्प्यात अमेरिका आणि कॅनडामध्ये ही सुविधा सुरू करण्यात आल्याचे या क्षेत्रातील एका अभ्यासकाने सांगितले.

जिथे जिथे वाढण्याची संधी आहे तिथे तिथे काम करण्याचे प्रत्येक कंपनीचे धोरण असतेच. त्या धोरणाला धरूनच हा फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही, असेही अभ्यासकांनी म्हटले आहे.