न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. अगदी देशातील करोनाच्या पार्दुर्भाव रोखण्यात यश मिळवण्यापासून ते देशाचे आर्थिक चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांपर्यंत अनेक गोष्टींचे कौतुक होताना दिसत आहे. मागील दोन आठवड्यांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणाऱ्या आर्डेन सोमवारी पुन्हा एका चर्चेचा विषय ठरल्या त्या एका मुलाखतीमुळे. मुलाखतीमध्ये त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे नाही तर त्या मुलाखत देत असतानाच भूकंप झाला आणि त्यानंतरही त्या जागेवरच उभ्या होत्या. भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण रुम हदरल्यानंतर पुन्हा त्यांनी गोंधळून न जाता संयम राखत मुलाखत सुरु ठेवली. त्यांच्या या संयमी आणि प्रसंगावधान राखणाऱ्या वृत्तीचे आता कौतुक होताना दिसत आहे.

न्यूझीलंड हेलार्डने दिलेल्या वृत्तानुसार सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार सव्वा सातच्या सुमारास आर्डेन या ‘द एएम शो’ या कार्यक्रमामध्ये रेयान ब्रिज याला मुलाखत देत होत्या. आर्डेन या त्यांच्या वेलिंग्टनमधील कार्यालयामधूनच व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुलाखतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्याचवेळी अचानक आर्डेन यांची संपूर्ण खोली हलू लागली. त्यावेळी आर्डेन यांनीच हा भूकंप असल्याचे सांगितले. नंतर हा भूकंप ५.८ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती समोर आली. वेलिंग्टनमधील संसदेच्या इमारतीमधूनच मुलाखत देताना भूकंप आला तरी आर्डेन गोंधळून गेल्या नाहीत. “एक एक एक मिनिटं… कदाचित भूकंप झाला वाटतं… बऱ्याच प्रमाणात येथे तो जाणवला” असं आर्डेन भूकंपाचा धक्का जावणल्यानंतर म्हणाल्या. त्यानंतर मुलाखत घेणाऱ्याने आपण मुलाखत सुरु ठेवावी का असा प्रश्न विचारला असता त्यांनी हसत होकारार्थी उत्तर दिलं. कॅमेरा हलल्याने जवळजवळ ३० सेकंद मुलाखतीमध्ये अडथळा आला आणि त्यानंतर आर्डे यांनी मात्र पुन्हा मुलाखतीमधील मुद्दा पुर्ण करत मुलाखत सुरुच ठेवली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा >> “देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून 4 Days Week चा विचार करा”; पंतप्रधानांचे कंपन्यांना आवाहन

अनेकांनी आर्डेन यांचे कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वीच आर्डेन यांनी जनतेशी संवाद साधताना देशातील पर्यटन व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी फोर डेज विकचा विचार कंपन्यांनी करायला हवा असं मत आर्डेन यांनी मांडलं होतं. त्याचप्रमाणे त्याआधी त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे कॅफेमध्ये परवानगी नाकरण्यात आली होती तेव्हाही त्या चर्चेत आल्या होत्या.