लग्न करायचं म्हटलं की अनेकदा लाखो रुपये खर्च केले जातात. लग्न थाटामाटात झालं पाहिजे असा हट्ट प्रत्येकाचाच असतो. म्हणून मग हळदीपासून ते वरातीपर्यंत सगळीकडे पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जातो. पण ओदिशामध्ये एका दांपत्याने समाजासमोर आदर्श उदहारण ठेवलं आहे. या दांपत्याने राज्यघटनेची शपथ घेत लग्नगाठ बांधली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या लग्नानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

ओदिशामधील बेरहामपूर येथे बिप्लब कुमार आणि अनिता यांचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी त्यांनी राज्यघटनेची शपथ घेत लग्नगाठ बांधली. लग्नानिमित्त बिप्लब कुमार आणि अनिता यांनी रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. यावेळी त्यांनी स्वत:देखील रक्तदान केलं.

“प्रत्येकाने हुंडा घेणं टाळलं पाहिजे. साध्या पद्धतीने लग्न करण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे फटाके तसंच मोठ्या आवाजात गाणी वाजवणं टाळता येतं. आम्ही आमच्या लग्नात वरातदेखील ठेवली नाही. त्याऐवजी रक्तदान शिबीर आय़ोजित केलं. प्रत्येकाने रक्तदानासारखं सत्कार्य केलं पाहिजे,” असं बिप्लब कुमार याने सांगितलं आहे. अनिताच्याही याच भावना असून तिने आपल्या आयुष्याची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“रक्तदानासारखं चांगलं काम करत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केल्याचा मला आनंद आहे. आमच्या लग्नात विधवा महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. इतरांनी यामधून प्रेरणा घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं,” असं अनिता यांनी सांगितलं आहे.