वय वर्षे २९ असलेला डॉक्टर याज्ञादत्ता रथ सध्या हिरो ठरला आहे. डोंगर चढून, नदी ओलांडून याज्ञादत्ता गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी धावून गेला. ओदीशामधील कंधमाल जिल्ह्यात तो राहत आहे. या जिल्ह्यात अनेक आदीवासी पाडे आहेत. याज्ञादत्ता गेल्या काही वर्षांपासून येथील गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. गावात अनेक प्राथमिक सुविधांचा आभाव आहे. पण गावातील आदीवासी महिलांना आपल्यापरीनं मदत करण्याचं काम तो करतो. याज्ञादत्ता देवासारखा गर्भवती महिलेच्या मदतीला धावून आला त्यामुळे बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.
गेल्या आठवड्यात या गावातील गर्भवती महिला सितादादू हिला प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होतं. परंतु घर ते रुग्णालय अंतर सात किलोमीटर होतं. रस्ता अवघड होता, जंगल आणि चढण असल्यामुळे कोणतीही गाडी वरपर्यंत पोहोचू शकत नव्हती. वाटतेच तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. त्यामुळे तिच्या पतीनं तिला जंगलातच सोडून मदतीसाठी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी याज्ञादत्ता रुग्णालयात होता. सितादादूपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिका आली. पण रस्ताच नसल्यानं रुग्णवाहिका तिच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. तिच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसली तरी याज्ञादत्ता तिच्या मदतीला धावून गेले. डोंगर चढून आणि नदी ओलांडून ते सितादादूपर्यंत पोहोचले. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दीड किलोमीटरचं अंतर त्यानं पायी कापलं. तो पोहोचेपर्यंत सितादादू प्रसूत झाली होती.
पण लहान मुलाची नाळ मात्र कापली नसल्यानं अजूनही धोका होताच. याज्ञादत्तानं त्यांच्यावर वेळेत उपचार केले. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती आता ठिक आहे. ‘ही महिला नदी ओलांडून रुग्णालपर्यंत कशी पोहोचेल हा विचार करूनच मी अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे तिच्यासाठी मी जोखीम उचलली’ अशी प्रतिक्रिया याज्ञादत्तानं द हिंदुस्थान टाइम्सला दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 30, 2018 5:33 pm