एखादी गोष्ट करायचीच असं मनात ठरवल्यावर अशक्य काहीच नसतं असं म्हणतात. एका शेतकऱ्याने हे सिद्ध करुन दाखवलंय. या शेतकऱ्याच्या शेतात पाणी येत नव्हतं, सरकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार विनवणी करुनही त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात होतं. अखेर या शेतकऱ्याने स्वतःच एक देशी जुगाड केला आणि शेतापर्यंत पाणी आणलं. त्याचा हा जुगाड बघून आता सगळ्यांचीच सगळेच हैराण झालेत.

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील ही घटना आहे. महुर टिपिरिया नावाच्या शेतकऱ्याने नदीपासून दोन किलोमीटर दूर असलेल्या आपल्या शेतात पाणी नेण्यासाठी एक देशी जुगाड केला. शेतकऱ्याने बांबू, लाकडं आणि लोखंडी सळयांच्या सहाय्याने वर्तुळाकार पवनचक्कीसारखं एक चक्र बनवलं. या चक्रामध्ये ३०-४० प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या खालचा भाग कापून जोडल्या. पवनचक्कीसारखं यंत्र पाणी आणि हवेच्या माध्यमातून फिरत राहतं, त्यामुळे त्यात जोडलेल्या बाटल्यांमध्ये नदीचं पाणी भरलं जातं. चक्र फिरतं असल्याने वरती गेल्यावर बाटल्यांमध्ये भरलेलं पाणी आपोआप खाली पडतं. हे पाणी खाली जमिनीवर पडत नाही तर शेतकऱ्याने काही पोकळ बांबूंचा वापर पाइपप्रमाणे केलाय. बाटल्यांमध्ये भरलेलं पाणी बरोबर पोकळ बांबूंमध्ये पडतं आणि त्याद्वारे थेट शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचतं. वृत्तसंस्था एएनआयने शेतकऱ्याने बनवलेल्या जुगाडचा व्हिडिओ शेअर केला आहे. “मी एक गरीब व्यक्ती आहे. सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी मी अधिकाऱ्यांना वारंवार विनवणी केली, पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर मी हे तयार केले” अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली. बघा व्हिडिओ :

दरम्यान, शेतकऱ्याने केलेला हा जुगाड पाहून नेटकरी चांगलेच प्रभावित झाले असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.