ओडिशामधील एक व्यक्ती आपल्या मुलासह चक्क झाडावर तात्पुरतं घर बांधून राहत असल्याचं समोर आलं आहे. त्याला कारणही तसंच आहे. केओन्झर जिल्ह्यातील कुसुमिता गावातील एका व्यक्तीने जंगली हत्तींच्या दहशतीमुळे झाडावर तात्पुरतं घर बांधलंय.

सुद्या महाकूड नावाचा हा व्यक्ती तीन दिवसांपासून एका झाडावर घर बांधून राहतोय. जंगली हत्तींनी तीन दिवसांपूर्वी त्यांच्या घराची नासधूस केली, तेव्हापासून ते झाडावर घर बांधून राहतायेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महाकूड म्हणाले की, “या परिसरात जंगली हत्ती सतत उपद्रव माजत असतात. तीन दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या घराची नासधूस केली. परिसरात हत्तींची दहशत आहे. त्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून मी माझ्या मुलासह झाडावर तात्पुरतं घर बांधून राहतोय. हत्तींच्या दहशतीमुळे रात्री झोप देखील लागत नाही. घराची नासधूस केल्यानंतर मी राज्य सरकारकडे घराची काहीतरी व्यवस्था करावी अशी विनंती केली होती, नुकसान भरपाई म्हणून मी राज्य सरकारकडे घराची मागणी केली होती. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही”.

दरम्यान, “जंगली हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न सुरू असून, कागदपत्रांची पूर्तता झालीये. याबाबत आम्ही महाकूड यांच्याशी चर्चा करुन त्यांना समजावून सांगितलंय, पुन्हा गावात परतण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे”, अशी माहिती केओन्झर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलीये.