ओदिशामधील एका आमदारनं खराब रस्त्यांमुळं इंजिनिअरला शिक्षक विद्यार्थांना जशी शिक्षा करतात तशी शिक्षा केली आहे. आपण लहान असताना वर्गात काही खोड्या केल्या किंवा चूकीचं वागल्यावर शिक्षक आपल्याला उठाबशा काढायची शिक्षा करतात. तसाच काहीसा प्रकार ओदिशामध्ये घडला आहे. बिजू जनता दलाचे पटनागढचे आमदार सरोज कुमार यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी खराब रस्त्यामुळे ज्यूनिअर इंजिनिअरला दोषी समजनू उठाबशा काढण्याची शिक्षा केली आहे. भररस्त्यात इंजिनियरला शिक्षा केली आहे. व्हिडीओमध्ये लोकांची चांगलीच गर्दी दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्यूनियअर इंजिनिअरला खराब रस्त्यांमुळं चांगलंच सुनावल्याचे दिसत आहे. त्यानंतर आपल्या कामात झालेल्या चुकीबद्दल इंजिनियरने माफी मागितली आहे. लोकांचा राग शांत करण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागल्याचं सरोज कुमार यांनी सांगितलं. हा व्हिडीओ पाच तारखेचा आहे.

दरम्यान, आमदार सरोज कुमार यांच्याविरोधात इंजिनिअरच्या पत्नीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांनी सरोज कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी अरिंदम डाकुआ यांनी याप्रकरणाचा अहवाल उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

या प्रकरणावर आमदार सरोज कुमार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, या प्रकरणाचा मला खेद आहे. पण, लोकांचा आक्रोश पाहून इंजिनिअरला मी उठाबशा काढण्यास सांगितल्या. रस्ते अतिशय दर्जाहिन असल्यामुळे लोक नाराज होते. जर मी इंजिनियरला उठाबशा काढायला लावल्या नसत्या तर लोकांनी त्याला इजा पोहचवली असती. तेथील परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर गेली होती. लोक रागामध्ये इंजिनियरला शिक्षा करण्याची मागणी करत होते. त्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागले.