वैमानिक बेपत्ता असल्याने उशीर झाल्यामुळे कुटुंबासोबत सुट्टीवर निघालेल्या वैमानिकाने विमानाचा ताबा घेत उड्डाण केलं. वैमानिक नसल्याने मँचेस्टरहून स्पेनला निघालेले प्रवासी अनेक तास ताटकळत उभे होते. या प्रवाशांमध्ये मायकल ब्रेडलीदेखील होते. आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी ते निघाले होते.

मायकल ब्रेडली यांना वैमानिक बेपत्ता असल्याचं कळल्यानंतर त्यांनी विमान कंपनीशी संपर्क साधला आणि उड्डाण करण्याची परवानगी मागितली. यानंतर त्यांनी विमानातील प्रवाशांना असामान्य परिस्थिती निर्माण झाली असून आपण विमानाचं उड्डाण करत असल्याची माहिती दिली.

“मी easyJet ला फोन करुन संपर्क साधला. टर्मिनलमध्ये हतबल उभा आहे. माझ्याकडे माझं लायसन्स, ओळखपत्र असून मला सुट्टीवर जाण्याची खूप इच्छा आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मदत करण्यासाठी मी उपलब्ध आहे,” असं सांगितलं असल्याची माहिती मायकल ब्रेडली यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी ३८ सेकंदात फोन करत मायकल ब्रेडली यांना उड्डाण कऱण्याची परवानगी दिली. यानंतर त्यांनी विमानात घोषणा करत आज आपण विमानाचं उड्डाण करत असल्याचं सांगितलं. यावेळी एका प्रवाशाने मायकल ब्रेडली यांचा व्हिडीओ मोबाइलमध्ये कैद केला. जर ही व्यक्ती नसती तर कदाचित आम्ही अडकूनच पडलो असतो असं लिहित त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.