गेल्या सहा महिन्यांत करोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. त्याचा प्राभाव आता काहीसा ओसरत चालला असल्याचे चित्र आहे. विविध देश त्यावर लस शोधण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. अस असताना या संसर्गजन्य आजारापासून खबरदारीसाठी वापरण्यात येणाऱ्या फेस मास्कला अद्यापही बाजारात मागणी कायम आहे. यापार्श्वभूमीवर विविध कंपन्या आणि ज्वेलर्स आपल्या विशिष्ट ग्राहकांसाठी मौल्यवान मास्क तयार करीत आहेत. इस्रायलची एका कंपनी देखील असाच एक महागडा मास्क बनवत आहे. या मास्कची किंमत ऐकून तुम्ही आवाक् व्हाल! हो कारण हा तब्बल ११ कोटी रुपयांचा मास्क आहे. व्हाइट गोल्ड आणि हिऱ्यांचा वापर करुन हा मास्क बनवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या मास्कची सध्या माध्यमांमध्ये खूपच चर्चा सुरु आहे.

भारतात आजवर विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे मास्क बाजारात आले आहेत. त्यांच्या किंमती काही हजारो रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत आहेत. कोईम्बतूर येथील एका सराफी व्यापाऱ्याने भारतातील सर्वात महागडा २.७५ लाख रुपयांचा सोन्याचा मास्क बनवला होता. यामध्ये सोनं आणि चांदीचे धागे बसवण्यात आले होते. मात्र, आता दागिने बनवणाऱ्या Yvel company नामक इस्रायली कंपनी बनवत असलेला मास्क हा तब्बल ११ कोटी रुपयांचा आहे. कंपनीने हा दावा केला आहे की, ते बनवत असलेला करोना व्हायरस मास्क हा जगातील सर्वाधिक महागडा मास्क आहे. या मास्कमध्ये सोन्याबरोबरच हिऱ्यांचा देखील वापर करण्यात आला असून त्याची किंमत दीड मिलियन डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये ११ कोटी रुपये आहे.

मास्कसाठी किती सोनं आणि हिऱ्यांचा झाला वापर?

जगातील या सर्वाधिक महागड्या मास्कसाठी १८ कॅरटच्या व्हाइट गोल्डचा वापर करण्यात येणार असून त्यावर ३,६०० पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या हिऱ्यांची सजावट करण्यात येणार आहे. त्यावर ग्राहकाच्या मागणीनुसार N99 फिल्टर बसवण्यात येणार आहे. हे मास्क बनवण्याचं काम सध्या सुरु असून ग्राहकाला तो या वर्षाच्या शेवटीपर्यंत हवा आहे. या मास्कचे डिझायनर इसाक लेवी यांनी ही माहिती दिली.

“पैशानं सर्वकाही विकत घेता येत नाही. पण जर असा महागडा मास्क घालून जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर फिरताना सर्वांच लक्ष वेधून घ्यायचं असेल आणि त्यातून त्याला आनंद मिळणार असेल तर त्यात गैर नाही. विेशेष म्हणजे या मास्कच्या कामामुळे आमच्याकडील कामगारांना या कठीण परिस्थितीत रोजगार उपलब्ध झाला आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे,” असंही लेवी यांनी असोसिएट प्रेसशी बोलताना सांगितले.