लग्नसमारंभातील वहिनीचा डान्स किंवा डान्सिंग अंकलचा डान्स बराच गाजला होता. त्यानंतर आता एका वयोवृद्ध जोडप्याचा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटीझन्सची पसंती मिळवत आहे. हे भारतीय जोडपे अतिशय उत्तम पद्धतीने एकमेकांची साथ देताना या व्हिडियोमध्ये दिसत आहेत. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत जितका वेळ घालवाल तितके तुमचे नाते अधिक दृढ होते असे म्हणतात. मग याला वयाचीही अट नसते हेच या व्हिडियोमधून दिसून येत आहे. तसेच आपला आनंद आणि प्रेम व्यक्त करायला वयाची अट नसते हेही यातून दिसून येत आहे. या वृद्ध जोडप्याचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे. एका कार्यक्रमात हे दोघेही कार्यक्रमाच्या मध्यभागी एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहेत. त्यांचे ट्युनिंगही अतिशय नेमके जमून आल्याचे यामध्ये दिसत आहे.

या डान्सचा व्हिडियो ट्विटरवर पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडियो अतिशय कमी वेळात जवळपास ७४ हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर जवळपास हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यामुळे या वयातील या दोघांचा उत्साह पाहून तुम्हालाही हुरुप येईल आणि तुमचे प्रेम नक्कीच ताजेतवाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले प्रेम कायम टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराला कधीतरी अशाप्रकारे साथ दिली तर काय हरकत आहे. हे होघेही बॉल डान्स करत असून ३३ सेकंदांचा हा व्हिडियो नेटीझन्सची मने जिंकत आहेत. यामध्ये डान्स करत असलेला पुरुष पंजाबी असल्याचे त्यांच्या पेहरावावरुन समजत आहे. तर डान्स करणारी महिला साडीतही अतिशय उत्साहाने सगळ्या स्टेप्स करत आहे.