भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकला. ऑलिम्पिकच्या वैयक्तिक स्पर्धेत भारताला १३ वर्षानंतर दुसरे सुवर्ण मिळाले आहे. या विजयानंतर सोशल नेटवर्किगंवरुन आनंद व्यक्त केला जात असतानाच निरजसंदर्भात माहिती सर्च केली जात आहे. अशाच नीरजचं एक जुनं ट्विट सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालं आहे. हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातील आहे. तसेच भाजपा समर्थकांनाही मोदींनी वेळोवेळी नीरजला केलेली मदत आणि त्यासंदर्भातील जुने ट्विट व्हायरल केल्याचं पहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१९ मध्ये मे महिन्यात दुसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर २४ मे रोजी नीरजने एक ट्विट केलं होतं. यामध्ये निरजने, “ऐतिहासिक विजयासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने नवीन उच्चांक गाठावेत अशी इच्छा व्यक्त करतो,” असं नीरजने म्हटलं होतं.

नक्की पाहा >> जन गण मन… १३ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये वाजलं भारताचं राष्ट्रगीत; Video पाहताच अंगावर काटा येईल

नक्की पाहा हे फोटो >> …अन् गोल्ड मेडल नीरजच्या गळ्यात; डोळ्यात आणि मनात साठवून ठेवावेत असे ‘सुवर्ण’क्षण

हेच ट्विट आता भाजपा समर्थक व्हायरल करत आहेत.

तसेच पंतप्रधान मोदींनी वेळोवेळी नीरजला कशी मदत केली यासंदर्भातील ट्विट्सही व्हायरल झालेत.

मोदींनी केलं अभिनंदन…

२००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमधील अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर अशी सुवर्ण कामगिरी नीरजने केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रासोबत फोनवर चर्चा केली. यासंदर्भात मोदींनीच ट्विट करुन सागितलं आहे. “नीरज चोप्राशी आताचं बोलनं झालं आहे. त्याला सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढतेचे कौतुक केले. जे टोक्यो २०२० दरम्यान पूर्ण प्रदर्शनात होते. नीरज उत्कृष्ट खेळ आणि खेळाडू वृत्तीचा परिचय देतो. त्याला भावी आयुष्यातील कार्यासाठी शुभेच्छा,” असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह राजकीय पक्षांचे नेते त्याचे अभिनंदन करत आहेत.